सोलापूर : दहा महिन्यांपासून बंद असलेली सोलापूर रेल्वे स्थानकांवरून सुटणारी आणि सोलापूरकरांची जीवनवाहिनी समजली जाणारी हुतात्मा एक्सप्रेस येत्या 15 दिवसांत सुरु होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी दिली.
हुतात्मा एक्सप्रेसने दररोज सोलापूर रेल्वे स्थानकांवरुन अनेक प्रवाशी पुणे येथे शिक्षण, नोकरी करण्यासाठी दररोज ये-जा करत असतात. मात्र कोरोना महामारीमुळे मागील दहा महिन्यांपासून ही गाडी सोलापूर रेल्वे स्थानकांवरच थांबून आहे. त्यामुळे लवकरच सोलापूरकरांना या गाडीने प्रवास करता येणार असल्याचे हिरडे यांनी सांगितले. हुतात्मा गाडी सुरु करण्याचा प्रस्ताव देखील वरिष्ठांकडे पाठविण्यात आला असल्याचे सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* वेळ आणि पैसा वाचणार
हुतात्मा एक्सप्रेस बंद असल्याने सोलापूरहून पुण्याकडे जाताना प्रवाशांना एसटी, खाजगी वाहन व इतर वाहनांचा पर्याय आहे. यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनांतून प्रवास करीत असताना वेळेची आणि पैसे जास्त मोजावे लागत आहे. त्यामुळे हुतात्मा एक्सप्रेसमुळे वेळेची आणि पैशांची बचत होईल. हुतात्मा एक्सप्रेस बंद असल्याने सोलापूरकरांना रस्तामार्गे पुणे गाठावे लागत आहे.
टॅक्सीने गेल्यास तीन हजारांवर खर्च येतो. स्वत:च्या गाडीने गेले तरी चार ठिकाणचा टोल पकडून तेवढाच खर्च येतो. रस्त्यावर वाहनांची वर्दळ जास्त असल्याने वेळ देखील जास्त लागतो. त्यामुळे हुतात्मा एक्सप्रेस सुरू झाली तर सोलापूकरांना लवकरच पुणे येथे पोहचता येईल.
“प्रवाशांची होणार सोय
टाळेबंदीच्या काळात अनेक प्रवासी गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. हुतात्मा एक्सप्रेसचा प्रस्ताव देण्यात आला आहे. हुतात्मा एक्सप्रेस सुरु झाल्यानंतर प्रवाशांची देखील सोय होणार आहे”– प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर