नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची चौथी आणि अंतिम कसोटी भारताने जिंकत ब्रिस्बेनमध्ये ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. भारताने बॉर्डर गावस्कर मालिका 2-1 अशी जिंकली आहे. ऋषभ पंतने केलेल्या नाबाद 89 धावांच्या जीवावर भारताने ऐतिहासिक विजयाची नोंद केली.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 369 धावा केल्या आणि भारताने प्रत्युत्तरात 336 धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 33 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 294 धावा करत भारताला विजयासाठी 328 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रोहित शर्मा 7 धावांवर बाद झाला. पण भारताचा शुबमन गिल याने दमदार अर्धशतकी खेळी केली. आपला तिसराच कसोटी सामना खेळणारा शुबमन गिल याने 146 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 91 धावांची खेळी केली. पुजाराच्या साथीने त्याने डाव सावरला. नव्वदीत असताना त्याने नॅथन लायनच्या बाहेरच्या रेषेत असलेल्या चेंडूला बॅट लावली आणि तो झेलबाद झाला. कर्णधार अजिंक्य रहाणे यानेही वेगाने धावा करण्यास सुरूवात केली होती. त्याने एक षटकार आणि एक चौकार खेचत फटकेबाजी केली. पण तो ही 22 धावांवर बाद झाला. अनुभवी चेतेश्वर पुजाराने भारतीय संघाची पारी सावरत 56 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या मयंक अगरवालने 9 धावा केल्या व तो बाद झाला.
मैदानात असलेल्या ऋषभ पंतने आक्रामक फलंदाजी करत ऑस्टेलियाच्या गोलंदाना सळो की पळो करून सोडले. त्याला वॉशिंगटन सुंदरने अप्रतिम साथ दिली. सुंदर 22 धावा करून लायनच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. त्याने 2 चौकार व 1 षटकार लगावला. ऋषभ पंतच्या साथीला आलेल्या शार्दुल ठाकुरही फार काळ टिकू शकला नाही तो 2 धावा करून झेल बाद झाला. त्यानंतर आलेल्या सैनी सोबत पंतने विजयश्री खेचून आणली. ऋषभ पंतने 9 चौकार व एक षटकाराच्या मदतीने सर्वाधिक नाबाद 89 धावांची खेळी केली.