पुणे : हॉटेलमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी निरनिराळ्या ऑफर्स आपल्यासाठी नवीन नाहीत. दहा-वीस टक्के सवलतीपासून ‘एकावर एक फ्री’ अशा एकापेक्षा एक जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील. पुण्यात गाजली ‘रावण थाळी’ गाजली होती. आता ‘विराट बुलेट थाळी’ गाजत आहे. काय आहे ते वाचा सविस्तर.
पुण्यातील एका रेस्टॉरंटने चक्क बुलेट जिंकण्याचं स्वप्न दाखवलं आहे. ‘विराट बुलेट थाळी’ एका तासात संपवा आणि बुलेट बाईक जिंका अशी ऑफर वडगाव मावळमधील शिवराज हॉटेलने दिली आहे.
कोरोना विषाणुमुळे देशातील सर्व व्यवसाय पुर्णपणे ठप्प झालेत. याचा सर्वाधिक फटका पर्यटन आणि हॉटेल व्यवसायाला बसला. परंतु संसर्ग आटोक्यात येत असल्याने अनेक नियमांसह हॉटेल्स व्यवसाय पुन्हा सुरु झालेत. पण कोरोनाच्या भितीने ग्राहक हॉटेलकडे फिरकायला तयार नाहीत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना नफ्यापेक्षा तोटाच अधिक सहन करावा लागत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल मालकांनी नवनवे फंडे वापरण्यास सुरु केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पुण्यातील शिवराज हॉटेल मालकाने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चक्क रॉयल एनफिल्ड बुलेट देण्याचे घोषित केले आहे. परंतु ही बुलेट मिळवण्यासाठी हॉटेलने ग्राहकांना खास अटी दिल्या आहेत. परंतु तरुणांची शान आणि जान असलेली बुलेट जिंकण्यासाठी ग्राहकांना या हॉटेलची खास नॉन व्हेज थाळी ६० मिनिटात फस्त करावी लागणार आहे.
या थाळीमध्ये जवळपास १२ पदार्थ आहेत. ज्यात ४ किलो मटण, फ्राय मच्छी, फ्राय सुरमई, पापलेट, चिकन तंदूरी, ड्राय मटण, ग्रे मटण, चिकन मसाला, कोळंबी व बिर्याणी यांसारखे पदार्थ आहेत. दरम्यान एकाच व्यक्तीला ही थाळी संपवायची आहे. जर ही थाळी ६० मिनिटात संपली तर ग्राहकांना १ लाख ६५ हजारांची बुलेट जिंकता येणार आहे. या हॉटेलमधील एकूण ५५ कर्मचाऱ्यांनी मिळून ही खास थाळी तयार केली आहे.
* सोलापूरचा पठ्ठ्या स्पर्धेचा विजेता
सोलापूरमध्ये राहणारे सोमनाथ पवार बुलेट थाळी स्पर्धेचे विजेते ठरले आहेत. त्यांनी चार किलो वजनाची थाळी एका तासाच्या आत गट्टम केली आणि बुलेट जिंकली. शिवराज हॉटेलमध्ये सहा प्रकारच्या भव्य थाळ्यांची विक्री होती. स्पेशल रावण थाळी, बुलेट थाळी, मालवणी फिश थाळी, पहलवान मटण थाळी, बकासूर चिकन थाळी आणि सरकार मटण थाळी या सहा थाळ्या तुम्हाला इथे चाखायला मिळतील. प्रत्येक थाळीची किंमत वेगवेगळी आहे.
* पुण्यातच गाजली होती ‘रावण थाळी’
पुण्यातील वडगाव मावळ भागात हे हॉटेल असून हॉटेलचे मालक अतुल वाईकर यांनी ही हटके, भन्नाट योजना सुरु केली आहे. शिवराज हॉटेलनं यापूर्वीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ६० मिनिटांमध्ये ‘रावण थाळी’ खाण्याची जरा योजना केली होती. ८ किलोची ही थाळी चार ग्राहकांनी एकत्रित ६० मिनिटांमध्ये संपवल्यास त्यांना ५ हजार रुपये बक्षिस आणि शिवाय त्या थाळीचं बिल माफ अशी ती योजना होती.