पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) पुणे, कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ५ हजार ६४७ सदनिका व राधानगरी (कोल्हापूर) येथील ६८ भूखंड विक्रीसाठी शुक्रवार (ता.२२) सकाळी दहा वाजता पुणे कॅन्टोन्मेंट येथील नेहरू मेमोरियल हॉल येथे संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. ५ हजार ६४७ सदनिकांच्या सोडतीसाठी ९२ हजार ३३५ अर्जदार पात्र ठरले आहेत.
उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोडतीचा शुभारंभ होणार आहे. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर आदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
‘वेबकास्टिंग’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोडतीचे थेट प्रक्षेपण बघण्यासाठी अर्जदारांनी http://bit.ly/PuneLottery2021 या लिंकवर क्लिक करावे, असे आवाहन पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी केले आहे. सोडतीचा निकाल सायंकाळी ६ वाजता https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल.
२० टक्के सर्व समावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका हद्दीत ४१० सदनिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत एक हजार २० सदनिका व कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत ६८ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. या सर्व सदनिका अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांसाठी उपलब्ध आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथील ६८ भूखंड देखील या सोडतीत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सोडतीचा कार्यक्रम कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने आखून दिलेल्या नियमावलीनुसार होणार आहे.
* असा आहे सदनिकांचा समावेश
सोडतीत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत म्हाळूंगे (चाकण), जि. पुणे – ५१४ सदनिका, तळेगांव दाभाडे (जि. पुणे) – २९६ सदनिका, करमाळा (जि. सोलापूर) – ७७ सदनिका, सांगली – ७४ सदनिकांचा समावेश आहे. म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत मोरवाडी पिंपरी (पुणे) – ८७ सदनिका, पिंपरी वाघेरे (पुणे) – ९९२ सदनिका, सांगली येथे १२९ सदनिका आहेत. प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत म्हाळुंगे (जि. पुणे) येथे १ हजार ८८० सदनिका, दिवे (जि. पुणे) १४ सदनिका, सासवड (जि. पुणे) ४ सदनिका, सोलापूर येथील ८२ सदनिकांचा समावेश आहे.