पुणे : पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीमध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या 5 जणांमध्ये 4 पुरूष आणि एका महिलेचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. त्यांना हडपसर येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांचा मृत्यू झाला आहे. पुणे इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत 4 जणांना बाहेर काढण्यात यश आलेले असून 5 जणांचे मृतदेह सापडलेले आहेत अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेली आहे.
सिरममध्ये आज गुरुवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती. आग लागल्याचे समजताच पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि इतर वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुणे मनपाच्या अग्नीशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी तसेच 100 जवान घटनास्थळी दाखल झाले होते.
सिरमच्या नवीन इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर आग लागली होती. तेथून काही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, आताच मिळालेल्या माहितीनुसार 5 व्या मजल्यावर असलेल्या 5 जणांचा आगीत मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 4 पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. प्रतिक पाष्टे ( डेक्कन पुणे), महेंद्र इंगळे (पुणे), रमाशंकर हरिजन ( उत्तर प्रदेश ) , बिपीन सरोज (उत्तर प्रदेश) , सुशीलकुमार पांडे (बिहार) असे मृतांची नावे आहेत.
दरम्यान, याबाबतची अधिकृत माहिती लवकरच देण्यात येणार असल्याचं विश्वसनीय सुत्रांनी सांगितलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आगीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार देणार सीरमला भेट देणार आहेत. तसेच “सीरममधील आग नियंत्रणात आली आहे. बीसीजी प्लांटमध्ये आगीचा प्रकार घडला आहे. सुदैवाने कोविशील्ड लस पूर्णपणे सुरक्षित आहे. विद्युत बिघाडामुळे आग लागली होती. पूर्ण माहिती घेतल्यानंतर पुढील भाष्य करणे योग्य ठरेल अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
कोरोनावरील “कोविशील्ड’ या लशीची निर्मिती सीरम इन्स्टिट्युटमध्ये होत आहे. काही दिवसांपुर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही देशांच्या राजदुतांनी सीरम इन्स्टिट्युटला भेट दिली होती. तर काही दिवसांपुर्वीच सीरम इन्स्टिट्युटमधून महाराष्ट्रासह देशाच्या वेगवेगळ्या भागात कोवीशील्ड ही लस पाठविण्यात आली. या सगळ्या घडामोडीमुळे सीरमकडे भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले होते.
* भाजपच्या आमदाराना शंका
भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनी व्यक्त केलेली शंका ही अत्यंत धक्कादायक आहे. आमदार मुक्ता टिळक यांनी या आगीमागे घातपाताची शंका आहे, का असा प्रश्न विचारुन, तशी शंका व्यक्त केली.
घातपाताचा प्रकार वाटतोय, प्रथमदर्शनी असं वाटतंय. कारण ज्याठिकाणी आग लागलीय, त्या परिसरात कोरोना लस बनवण्याचं काम सुरु आहे. हा घातपाताचा प्रकार वाटतोय ही माझी शंका आहे”, असं भाजप आमदारा मुक्ता टिळक म्हणाल्या.
* आग लागली की लावली? चौकशी व्हावी
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीमध्ये आग लागल्याची घटना घडली. सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीबद्दल वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शंका व्यक्त केली आहे. ‘आग लागली हे मला व्हॉट्सअॅप मेसेज आणि सोशल मीडियावरुन समजलं. ही आग लागली आहे की लावलेली आहे, याची चौकशी झाली पाहिजे,’ अशी मागणी त्यांनी केली. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.