सोलापूर : कोरोना काळात विजेचा अतिरिक्त वापर झाला असेल पण तो तीन ते चारपट नक्कीच झाला नसेल, असा अंदाज व्यक्त करीत रोहित पवारांनी राज्य सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. मात्र सर्वसामान्य ग्राहकांचा आवाज ऊर्जामंत्र्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचंही रोहित पवारांनी सोलापुरात सांगितलं.
आमदार रोहित पवार यांनी आज गुरुवारी सकाळी सोलापूरच्या क्रिकेट मॅच खेळण्याचा आनंद घेतला. यावेळी कार्यकर्त्यांना रोहित पवारांची वेगळीच झलक पाहवयास मिळाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील नूतनीकरण होत असलेल्या पार्क मैदानला भेट दिली. हे काम स्मार्ट सिटी योजनेतून होत आहे. स्मार्ट सिटीचे सीईओ त्र्यंबक ढेंगळे पाटील यांच्याशी चर्चा केली.
पत्रकारांशी संवाद साधण्याअगोदर मैदानावर पत्रकारांसमवेत क्रिकेटचा आनंदही घेतला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रोहित पवार म्हणाले, ग्राहकांना आलेल्या बिलाचा प्रत्यक्ष वापर कसा झाला याचा रिपोर्ट एमएसईबीने काढलाय का? तो रिपोर्ट काढण्याबाबत आदेश दिलेत का? असे सवाल विचारत, आदेश दिले असल्यास अहवाल काय आलाय, हे पाहावे लागेल, असेही रोहित पवार म्हणाले.
थकित वीज बिलाच्या कारवाईबाबत रोहित पवारांनी काही सवाल उपस्थित केले. वाढीव वीज बिलाची शहानिशा करण्याची गरज आहे. वाढीव वीज बिल कमी करण्याबाबत किंवा प्रत्यक्ष जेवढा वापर झाला, तेवढेच बिल द्यावे. यासाठी सरसकट धोरण करता येईल का, याचा अभ्यास राज्य सरकारने करावा, असंही रोहित पवारांनी सुचवलं.
तसेच, तरुणांचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या रोजगाराचा प्रश्न महत्वाचा आहे. त्यामुळे त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचं आहे. महाविकास आघाडी ही कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर काम करते. त्यामुळे अनेक प्रश्नांवर काम करायचे आहे” असे रोहित पवार म्हणाले.
* सोलापूर विद्यापीठालाही भेट
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला रोहित पवारांनी भेट दिली. येथील गुण वाढवण्याच्या गैरप्रकारावर सवाल विचारला असता नाराजी व्यक्त केली.
ज्ञानपीठ असणाऱ्या विद्यापीठातील परीक्षा नियंत्रकच या गैरप्रकारात सामील असल्याने हे प्रकरण राज्यात गाजत आहे. यावर आमदार रोहित पवार यांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे. सोलापूर विद्यापीठामध्ये नेमकं काय घडलं हे बघावं लागेल. जेव्हा एखादी प्रश्नपत्रिका आउट होते, तेव्हा ही प्रश्नपत्रिका विकत घेणारे विद्यार्थी असतात श्रीमंत वर्गाचे.
मात्र सर्वसामान्य व कष्ट करण्याची ताकद आहे, असे गरीब विद्यार्थी मागे पडतात. विद्यापीठ हे ज्ञानपीठ असते, अन् अशा ज्ञानपीठात असे गैरप्रकार घडत असेल तर त्याच्या खोलात जायची गरज आहे. असे गैरकृत्य युवकांना पटणारे नाही. संबंधित दोषींवर कडक कारवाई व्हावी, असे आमदार रोहित पवार म्हणाले.
* औरंगाबादच्या नामांतरावर प्रतिक्रिया
औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. मी माझं व्यक्तिगत मत अनेक वेळा मांडलं आहे. एखाद्या शहराचं, गावाचं नाव बदलायचं असेल, तर त्या गावातील लोकांनाही विश्वासात घ्यावं. लोकशाही पद्धतीने किंवा अन्य माध्यमातून त्यांचं मत जाणून घेतलं, तर जो काय निकाल येईल, त्या निकालाला ताकद देण्याची जबाबदारी सरकारची असेल, असं रोहित पवार म्हणाले.