मुंबई : हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमात अनेक दिग्गज एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्राला एक चांगली राजकीय परंपरा आहे. राजकारण आणि वैयक्तिक संबंध या दोन टोकाच्या गोष्टी आहेत. हे दोन्ही टोक एकमेकांजवळ कधीच पोहोचत नाही, असा महाराष्ट्राचा इतिहास आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे प्रत्येक पक्षातील नेत्यांशी जिव्हाळ्याचा संबंध होता. महाराष्ट्राच्या राजकारणाची ही परंपरा अजूनही तशीच अबाधित आहे हे आजच्या कार्यक्रमातून सिद्ध होत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज कुलाबा येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, महापौर किशोरी पेडणेकर, रश्मी ठाकरे, नीलम गोऱ्हे, मंत्री उदय सामंत, अमित ठाकरे आणि अनेक मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकापर्ण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी सर्वच पक्षातील राजकीय दिग्गजांनी हजेरी लावली.
* पुतळा उभारणीचा घटनाक्रम
बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष यशोधर फणसे यांनी ऑक्टोबर 2015 ला गटनेत्यांच्या बैठकीत मांडला. दक्षिण मुंबईत गेटवे ऑफ इंडिया जवळील रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील चौकात बाळासाहेबांचा पुतळा उभारला जाणार होता. मात्र ही जागा छोटी असल्याने पुतळ्याची जागा बदलण्यात आली.
स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केलेल्या मागणीनुसार हा पुतळा आता दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर डॉ.शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात आला आहे. 9 फूट उंचीचा पुतळा, 2 फूट उंच हिरवळ (लँडस्केप), चबुतरा सह 11 फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे.
गेले काही वर्ष हा पुतळा लालफितीत अडकला होता. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या महाआघाडीचे सरकार सत्तेवर येताच हा पुतळा उभारण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या देण्यात आल्या आहेत.