मुंबई : कृषी कायद्यांना विरोध करणारा कम्युनिस्ट संघटनेचा मोर्चा आज मुंबईत काढण्यात आला. यावेळी मोर्चेकरी आणि पोलीसांमध्ये मोठी झटापट झाली. पोलिसांनी या आंदोलकांना रस्त्यात अडवले. यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला. अनेकांना पोलीसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, एकीकडे राज्यात सरकार मध्ये असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते यात सहभागी होते. तर राज्य सरकारच्याच आदेशाने पोलीसांनी मोर्चाला अडवल्याचा आरोप होत आहे.
संध्याकाळपासून आझाद मैदानात धरणे धरणाऱ्या शेतकरी आंदोलकांनी राजभवनाच्या दिशेने कूच केली आहे. मात्र, मोठ्या संख्येने हे मोर्चेकरी राजभवनाच्या दिशेने निघाल्याने पोलिसांनी या आंदोलकांना अडवलं आहे. त्यामुळे मोर्चेकरी आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली. त्यामुळे मोर्चेकऱ्यांनी ‘दादागिरी नही चलेगी’ अशा घोषणा देत रस्त्यावरच एल्गार पुकारल्याने प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे.
आझाद मैदानात नेत्यांची भाषण झाल्यानंतर शेतकरी नेते अजित नवले, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, तिस्ता सेटलवाड, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप आणि सचिन सावंत आदी नेते मोर्चेकऱ्यांसोबत राजभवनाकडे निघाले होते. या नेत्यांसोबत हजारो मोर्चेकरी लालबावटे घेऊन राजभवनाकडे निघाले. अचानक मोठ्या प्रमाणावर जमाव जमा झाल्याने पोलिसांनी मेट्रो सिनेमाजवळ शेतकऱ्यांना अडवलं. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली.
त्यामुळे ‘मोदी सरकार हाय हाय’, ‘मोदी सरकार मुर्दाबाद’च्या घोषणा यावेळी शेतकऱ्यांनी दिल्या. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मेट्रो सिनेमाजवळच्या चौकातच ठिय्या आंदोलन सुरू केलं. काँग्रेस नेते भाई जगताप, सचिन सावंत, अजित नवले यांनी रस्त्यावर बसून जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे वातावरण तापलं होतं.
त्यानंतर पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे आंदोलक अधिकच संतप्त झाले होते. त्यामुळे भाई जगताप, सचिन सावंत, अजित नवले, किशोर ढमाले आदी नेत्यांनी मेट्रो चौकात रस्त्यावरच बसून ठिय्या आंदोलन सुरू केलं. यावेळी काही आंदोलक ट्रॅक्टर घेऊन आले होते. पोलिसांनी या आंदोलकांनाही मध्येच अडवलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, मेट्रो सिनेमाच्या चौकात पोलिसांनी आंदोलकांना अडवलं असून त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कुणालाही राजभवनाच्या दिशेने जाण्यास मनाई करण्यात आली आहे. पोलिसांनी आधीच या मोर्चाला मनाई केली आहे. त्यामुळे या आंदोलकांना मेट्रो चौकात अडवलं आहे. पोलिसांनी शेतकऱ्यांच्या 23 प्रतिनिधींनाच राजभवनाकडे जाण्याची परवानगी दिली आहे. राजभवनाकडे जाण्यासाठी या प्रतिनिधींना पोलीस व्हॅनमध्ये बसवण्यात आलं आहे.
* व्यापा-यांनी दुकानं बंद ठेवली
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया यांच्यावतीनं मुंबईत विविध ठिकाणी भारत बंदच्या पार्श्वभूमीवर आंदोलनं करण्यात आली. मुंबईतील मरोळ, पवई, अंधेरी रेल्वे स्थानक, मालवणी(मालाड), मीरारोड आदी ठिकीणी मोर्चे, निदर्शनं, मानवी साखळीचं आयोजन करण्यात आलं. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि सीपीआयएमच्या वतीनं संयुक्त आंदोलन करण्यात आलं. मुंबईच्या जनजीनवावर या भारत बंदचा फारसा प्रभाव पडला नसला तरी अनेक ठिकाणी व्यापा-यांनी दुकानं बंद ठेवणंच पसंत केलं होतं.