सांगली : दिल्लीमध्ये प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. त्यानंतर या हिंसाचारामागे नेमका कोणाचा हात असावा असा प्रश्न सर्वांना पडला आहे. रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारामागे भाजपचा हात आहे असा दावा काही राजकीय पक्षांकडून केला जातोय. त्यानंतर दिल्लीच्या हिंसाचारामागे केंद्र सरकारला जबाबदार धरणे योग्य नाही. हिंसाचार भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला, असा खोटा अपप्रचार केला जात आहे, असे स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले.
तसेच,दिल्लीतील हिंसाचाराचे जयंत पाटील एक प्रकारे समर्थन करत आहेत, असा आरोपही चंद्रकांत पाटलांनी केला. केंद्र सरकारने शेतकरी आंदोलन योग्यप्रकारे न हाताळल्यामुळे हिंसाचाराची परिस्थिती उद्भवल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला होता. त्यांच्या आरोपांना चंद्रकांत पाटील यांनी हे उत्तर दिले. ते सांगलीत बोलत होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“दिल्लीच्या हिंसाचारामागे केंद्र सरकारला जबाबदार धरणे योग्य नाही. हिंसाचार भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला, असा खोटा अपप्रचार केला जात आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मंत्री आहेत. त्यांनी जबाबदारचे भान ठेवून वक्त्यव्य करावे. दिल्लीतील हिंसाचाराचे जयंत पाटील एक प्रकारे समर्थन करत आहेत, त्यांनी केंद्र सरकारवर हिंसाचाराला जबाबदार धरण चुकीचं आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
दिल्लीतील लाल किल्ल्यावर प्रजासत्ताकदिनी फडकवण्यात आलेल्या झेंड्याबद्दल आणि उफाळलेल्या हिंसेबद्दल दीप सिंह सिद्धूला जबाबदार ठरवले जात आहे. हाच दीप सिंह सिद्धू काही फोटोंमध्ये भाजप खासदार सन्नी देओल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत दिसतो आहे. त्यामुळे दिल्लीतील हिंसाचारामागे भाजपचा हात आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मात्र, दीप सिंह सिद्धूचा माझ्याशी कोणताही संबंध नसून तो फक्त निवडणुकांच्या वेळी माझ्यासोबत होता, असं स्पष्टीकरण सन्नी देओल यांनी दिलं आहे.