नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसेचे वळण लागले. या घटनेत 86 पोलीस कर्मचारी जखमी झाले तर एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी या हिंसक घटनेत भाजपच्या एका नेत्याचा हात असल्याची शंका व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत ही शंका व्यक्त केली आहे.
केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे राजधानी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. मात्र, या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या हिंसाचारानंतर आंदोलकांनी लाल किल्ल्यात शिरून मोठी तोडफोड केली. पोलिसांनाही मारहाण केल्याचे समोर आले. याच पार्श्वभूमीवर भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोठे विधान केले आहे.
लाल किल्ल्यावर जो हिंसाचार झाला, त्यामागे ‘पीएमओ’च्या जवळील भाजप नेत्याचा हात आहे, असा संशय सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजचा आधार घेत सुब्रमण्यम स्वामी स्वामी यांनी घेतला आहे. सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, दबक्या आवाजात एक चर्चा सुरू आहे. कदाचित त्यात काहीही तथ्य नसेल. ते खोटेही असू शकेल किंवा शत्रूंच्या आयटी सेलकडून वावड्या उठवल्या जात असतील की, ‘पीएमओ’च्या जवळील व्यक्तीने लाल किल्ल्यावरील हिंसाचाराला खतपाणी घालण्याचे काम केले. नीट तपासून माहिती घ्यावी, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शेतकरी आंदोलनातील हिंसाचारात सामील असलेला आरोपी दीप सिद्धू हा भाजप खासदार सनी देओल यांच्या निवडणूक प्रचारात सहभागी झाला होता, अशा आशयाचे ट्विटही सुब्रमण्यम स्वामी यांनी रिट्विट केले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्रही लिहिले आहे.
दरम्यान, दिल्लीतील ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारात शेतकऱ्यांचे आक्रमक रुप पाहायला मिळाले. शेतकरी नेत्यांनी दीप सिद्धू यांच्यावर शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप केला आहे. योगेंद्र यादव, भारतीय किसान युनियनचे हरियाणा प्रदेश अध्यक्ष गुरनाम सिंह यांनीही दीप सिद्धू यांच्यावर शेतकऱ्यांना भडकावून त्यांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. मात्र, दीप सिद्धू यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
* मोदी आणि शाह यांची प्रतिमा मलीन
राज्यसभेचे सदस्य असलेल्या खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आणखी एक ट्विट केले आहे. यामध्ये, दिल्लीतील शेतकरी आंदोलकांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची प्रतिमा डागाळली गेली आहे, असे मत सुब्रमण्यम स्वामी व्यक्त केले आहे. याशिवाय त्यांनी पंजाबमधील काँग्रेस सरकारवरही जोरदार टीका केली.