पुणे : पुण्यात ब्राह्मण महासंघाच्या महिलांनी भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले. देवीच्या मंदिरांमध्ये महिला पुजारी नेमाव्यात, अशी मागणी केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. त्या हिंदू धर्माच्या परंपराबाबत विरोधी भूमिका घेतात. पब्लिसिटी स्टंट करत असतात. मात्र यापुढे हे खपवून घेणार नाही, असे ब्राह्मण महासंघाच्या महिला कार्यकर्त्यांनी म्हटलं.
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई या महिलांच्या प्रश्नांविषयी नेहमी आक्रमक असतात. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी धार्मिक ठिकाणी महिलांच्या प्रवेशाविषयी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. मात्र, आता त्यांनी मंदिरात महिलांना प्रवेश तर हवाच. शिवाय मंदिरात महिला पुजारी पाहिजेत, अशी मागणी केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
साडेतीन पीठांपैकी एक पीठ असलेले श्रीक्षेत्र माहूर येथील रेणुकादेवी मंदिरात एकही महिला पुजारी नाही. शक्तिपीठ देवीचे असूनही देवीला अभिषेक, साडी, मंगळसूत्र घालण्याचे काम पुरुष पुजारी करतात. या ठिकाणी ५० टक्के महिला पुजारी हवेत, अशी मागणी मंदिर विश्वस्तांकडे करण्यात आली आहे.
या ठिकाणी महिला पुजारी घेऊन राज्यात आदर्श निर्माण करावा, मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिला.महिलांना मासिक पाळी येत असल्याने त्यांना पुजारी म्हणून घेतले जात नाही, असे कारण सांगितले जाते. परंतु, स्त्री-पुरुष समानता असली पाहिजे. ही आंदोलनाची भूमिका असून माहूर येथील महिला नगरसेविकांसोबत यासंबंधी चर्चा करण्यात आली. मंदिराच्या विश्वस्तांमध्येही महिलांचा समावेश झाला पाहिजे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
दरम्यान, देसाई यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात आज गुरुवारी ब्राह्मण महासंघाच्या वतीने जोडे मारो आंदोलन केले. तृप्ती देसाई सातत्याने हिंदू धर्माच्या परंपराबाबत विरोधी भूमिका घेत असतात. फक्त पब्लिसिटी स्टंट त्या करत असतात. मात्र यापुढे हे खपवून घेणार नाही, असे ब्राह्मण महासंघाच्या महिला कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. यावेळी जिल्हाध्यक्षा मधुरा बर्वे, शहराध्यक्षा नीता जोशी, युवती आघाडी प्रमुख क्रांती गोखले आणि प्रदेश पदाधिकारी तृप्ती तारे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.