सांगली / सोलापूर : सांगली जिल्ह्यातील आटपाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकालाच बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सांगली शहराजवळील कर्नाळ रोड येथील हॉटेल रणवीरमध्ये सुरु असलेला हाय प्रोफाइल वेश्या व्यवसायाचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला. विशेष म्हणजे अटक केलेले पोलिस निरीक्षकाने सोलापुरात लाचलुचपत प्रतिबंध खात्यात चांगली कामगिरी बजावली होती. अनेक बड्या बड्या अधिका-यांना बेड्या ठोकल्या होत्या. आता त्यांनाच बेड्या ठोकल्याने सध्या सोलापूर पोलिस प्रशासनातही चर्चा होतीय.
एका पोलिस निरीक्षकासह 6 जणांना अटक करण्यात आली. तर दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आटपाडीच्या पोलीस निरीक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत.
सांगली जिल्ह्यात कर्नाळ रोडवरील ‘हॉटेल रणवीर’वर छापा टाकून पोलिसांनी कारवाई केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, हॉटेल मालक, एजंट यांचाही समावेश आहे. हॉटेलमधील छापेमारीत दोन तरुणीही सापडल्या. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
अरुण देवकर असे अटक केलेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. सोलापूरला लाचलुचपत विभागात असताना अनेक लाचखोर पोलिसासह बड्याबड्या शासकीय अधिका-यांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यामुळे ते सोलापुरात चर्चेत होते. हॉटेल मालक राघवेंद्र शेट्टी, रवींद्र शेट्टी, राजेश यादर, शिवाजी वाघले, सत्यजित पंडित अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर दोन महिलांची महिला सुधारगृहात रवानगी केली आहे.
वेश्या अड्ड्यावर पोलिस निरीक्षकाला अटक झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पिटा (अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक) कायद्यानुसार हॉटेलवर कारवाई करण्यात आली. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.