सोलापूर : जिल्हाधिकारी साहेब, तुमच्याकडून पैसे कसे घ्यायचे. आपण पैसे देऊ नका, अशी विनंती करणा-या शेतकऱ्याची विनंती नाकारत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हसतमुखाने पेरू, पपई आणि डहाळीचे १३० रुपये दिले. जिल्हाधिकाऱ्यांचा आग्रह पाहून शेतकऱ्याने विनम्रतेने पैसे स्वीकारले. यावेळी शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आणि त्याने दिलखुलासपणे जिल्हाधिकाऱ्यांना दुवा दिली.हा प्रसंग घडला संत सावता माळी रयत बाजार अभियानाचे उद्घाटनावेळी.
शेती पिकांच्या विक्रीला प्रोत्साहन देणाऱ्या संत सावता माळी रयत बाजार अभियानाचे उद्घाटन काल बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्याच्या विक्री स्टॉलवर पपई, पेरू आणि हरभरा डहाळे विकत घेतले. खरेदीनंतर जेव्हा जिल्हाधिकारी त्यांच्या पॉकिटमधून पैसे देत होते, तेव्हा शेतकऱ्याने हात जोडून विनम्रतेने पैसे नाकारले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापूर-पुणे महामार्गावर वरवडे टोलनाक्यावर बापू लोंढे यांच्या विकेल ते पिकेल योजनेतील स्टॉलचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे, तालुका कृषी अधिकारी दुरंगे, आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कल्पनेतून विकेल ते पिकेल योजना सुरू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून बुधवारी संत सावता माळी रयत बाजार योजनेतून विकेल ते पिकेल योजना सुरू करण्यात आली आहे.