मुंबई : राज्याचे मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आपल्या शैलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची खिल्ली उडवली आहे. मनसे ही केवळ टाइमपास टोळी असल्याची खोचक टीका आदित्य यांनी केली. ती संघटना आहे की पक्ष तेच मला कळत नाही. त्यांचे कार्यकर्ते देखील त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. मग आपण का द्यावे? ही तर टाइमपास टोळी आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
शिवसेना नेते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेच टाइमपास टोळी असल्याचं म्हणत खिल्ली उडवली आहे. शिवसेनेकडून खंडणी वसूल केली जात असल्याचा आरोप करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवेसना वीरप्पन गँग असल्याची टीका केली होती.
फेरीवाल्यांकडून शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दाखवून खंडणी उकळण्याचं काम चालू असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. दरम्यान या टीकेला आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“मनसे ही संघटना आहे की पक्ष आहे मला कळत नाही. त्यांचे कार्यकर्तेही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मग आपण का द्यावं? ही तर टाइमपास टोळी आहे,” असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
“वीरप्पनने जेवढं देशाला लुटलं नसेल, त्यापेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेला लुटलं आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत वीरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल. सन्माननीय बाळासाहेबांचे फोटो लावून खंडणी उकळणार असाल तर शिवसेनेला यापुढे बाळासाहेबांचा फोटो लावण्याचा किंवा नाव घेण्याचाही अधिकार उरत नाही,” असं संदीप देशपांडेंनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.