सिंधुदुर्ग : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, ‘आमच्या मित्राने बाळासाहेबांच्या सिद्धांताला तोडून सरकार बनवले. उद्धवजी सांगतात मी बंद खोलीत मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले होते. मात्र, मी बंद खोलीत काही बोलत नसतो. जे काही बोलतो छाती ठोकपणे बोलतो. उद्धवजी ज्या सभा घेत होते, त्यात देवेंद्रजींचे मोठ- मोठे फोटो होते. देवेंद्रजींच्या चेहऱ्यावरच निवडणूक लढली गेली. मात्र, आमच्या मित्राने दगाफटका केला’.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांना बंद खोलीत कोणतंही वचन दिलं नव्हतं, असं अमित शहा यांनी आज पहिल्यांदाच सांगितलं. यासोबतच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर यावेळी थेट टीका केली. “शिवसेनेनं खोटंनाटं बोलून आमच्याशी दगाबाजी केली. मी बंद खोलीत वचन दिल्याचं म्हटलं गेलं. पण मी असं कोणतंच वचन दिलं नव्हतं. मी बंद खोलीत नव्हे, तर खुलेआम वचन देणारा आणि ते पाळणारा व्यक्ती आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता वाटपाच्या फॉर्म्युल्यावरून नाराज होत शिवसेनेनं भाजपासोबत युती तोडत काँग्रेस व राष्ट्रवादीशी आघाडी केली. भाजपानं मुख्यमंत्रीपदासह सत्ता वाटपात ५०-५० स्थान देण्याचं वचन दिलं होतं, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. बंद दाराआड झालेल्या बैठकीतील वचनावर भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री यांनी मौन आज सोडलं. कोणतंही वचन दिलं नसल्याचं ठणकावून सांगत अमित शाह यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीतील मित्र पक्षांवर घणाघाती टीका केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नारायण राणे यांच्या लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झालं. यावेळी शाह यांनी शिवसेनेकडून केल्या जाणाऱ्या आरोपाचा समाचार घेतला.”बाळासाहेबांच्या सर्व वचनांना काशीत बुडवून शिवसेनेनं सत्ता मिळवली. पण आम्ही तुमच्या मार्गानं चालणार नाही. आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो तर शिवसेनाच उरली नसती”, असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे.
“मी भाजपाध्यक्ष असताना महाराष्ट्रात निवडणुका झाल्या होत्या. आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलो होतो. पण, त्यानंतर तीन चाकी रिक्षाचं सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात आलं. तिन्ही चाकं वेगवेगळ्या दिशेनं चालतात. हे सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरलं आहे. मी आज महाराष्ट्रातील जनतेला सांगण्यासाठी आलो आहे. तुम्ही जो जनादेश दिला होता, त्याचा अपमान करून सत्तेच्या लालसेपोटी इथे सरकार स्थापन करण्यात आलं.
मोदीजी आणि देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा-शिवसेनेच्या सरकारसाठी जनादेश होता. जे म्हणत आहेत की आम्ही वचन तोडलं. त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की आम्ही वचनावर ठाम राहणारी माणसं आहोत. अशा प्रकारचं खोटं आम्ही बोलत नाही. बिहारमध्ये आम्ही निवडणूक लढलो. आम्ही वचन दिलं होतं की एनडीएचं सरकार आलं, तर मुख्यमंत्री नितीश कुमार होणार. आमच्या जागा जास्त येऊनही आम्ही नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलं,” अशा शब्दात अमित शाह यांनी शिवसेनेला उत्तर दिलं.