नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोने व चांदीवरील आयात शुल्क कमी केले. त्यानंतर गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. तर गेल्या 6 महिन्याच्या दरावर नजर टाकली तर सोने सातत्याने स्वस्त होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या 6 महिन्यात सोन्याच्या दरात जवळपास 9 हजार रुपयांची घसरण झाली आहे.ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर 10 ग्रॅमसाठी 56,200 रुपयांवर पोहोचले होते. तर सध्या हेच दर 47 हजार रुपयांच्या आसपास आले आहेत.
भारतीयांसाठी सोने खरेदी ही आवडती गोष्ट आहे, जगातील सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक भारत आहे. ऑगस्ट 2020 पासून सोन्याच्या दरातील कपात अद्यापही सुरूच आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर दहा ग्रॅमसाठी 56,200 रुपयांवर पोहोचले होते. त्याच वेळी, आता (5 फेब्रुवारी 2021) सोन्याचे प्रति दहा ग्रॅम दर 46,738 रुपयांवर आले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तज्ज्ञ म्हणतात की, कोरोना संसर्गाची भीती आता लोकांच्या मनातून निघून गेलीय. म्हणूनच लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने विकत घेण्यास फारसा रस दाखवत नाहीत. गुंतवणूकदार आता शेअर बाजाराकडे वळले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत सोन्याच्या किमती आणखी खाली होऊ शकतात. देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 42 हजार रुपयांपर्यंत घसरू शकते.
अर्थसंकल्पात सोन्यावरील सीमाशुल्कात कपात केल्याने दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमत 1000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47 हजार रुपयांवर आली आहे. तज्ज्ञांना असा विश्वास आहे की, सोन्याच्या किमती घसरण्याचा कल पुढील 15 दिवस सुरूच राहू शकेल. पण, दिवाळीपर्यंत पुन्हा दहा ग्रॅम सोने 50 हजार रुपयांपर्यंत पोहोचेल.
* सोने का स्वस्त होऊ लागले ?
2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क 7.5 टक्क्यांवर आणण्याचा प्रस्ताव दिला. सध्या ते 12.5 टक्के आहे. यापूर्वी जुलै 2019 मध्ये शुल्कात 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे दर झपाट्याने वाढले होते.
आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकन डॉलरची किंमत वाढत चालली आहे. म्हणूनच सोन्याचे दर सतत घसरत आहेत. परदेशी बाजारात सोन्याची किंमत प्रति औंस 1800 डॉलरवर आली आहे. नोव्हेंबर 2020 नंतर हे घडले आहे. चांदीच्या किमतींमध्ये अजूनही चढउतार कायम आहे. यामागील औद्योगिक मागणीत तेजी आहे. कमोडिटी मार्केटमधील काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर जगातील आर्थिक घडामोडी अशाच प्रकारे चालू राहिल्या, तर येत्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत आणखी घसरण येऊ शकते.
शुक्रवारी पतधोरण समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत रिझर्व्ह बँकेने असे सूचित केले आहे की, बँकांना सीआरआर पातळी आधीच्या कोरोना व्हायरसपर्यंत घ्यावी लागेल. त्यानंतर व्याजदरात वाढ होण्याची चिन्हे देखील आहेत, यामुळे सोन्याच्या किमतींवर दबाव वाढणार आहे. तज्ज्ञांचे मत आहे की, सोन्याच्या किमती सध्याच्या पातळीवरून 4600 रुपयांवरून प्रति दहा ग्रॅमपर्यंत घसरून 42000 रुपयांवर येऊ शकतात.