मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे. पण पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चित्रा वाघ यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे सुडबुद्धीने आपल्याला त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून काढून घ्यावा आणि हा तपास एखाद्या सक्षम आयपीएस अधिकाऱ्याला सोपवावा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे केली आहे. आमच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे पुणे पोलिसांनी दिलेले नाहीत. सगळे पुरावे असतानाही पोलीस आणि सरकार कुणाचा वाट पाहते आहे, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.
* हा सुडबुद्धीने केलेला प्रकार – चित्रा वाघ
चित्रा वाघ म्हणाल्या की, मला आणि माझ्या पतीला याबाबत कुठलीही माहिती न देता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मला माझी बाजू मांडण्याची संधी देखील दिली गेली नाही. हा सुडबुद्धीने केलेला प्रकार आहे. कायदेशीर लढा देण्यासाठी मी तयार आहे, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* यावर एसीबीचे म्हणणे
चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. परळच्या महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयाशी संबंधित एका प्रकरणात किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास सुरु होता. या प्रकरणात आता गुन्हा दाखल केला आहे. एसीबीकडून सांगण्यात आलं आहे की, अनेक दिवसांपासून तपास सुरु होता. त्यामुळं आता काही माहितीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्याकडे असलेल्या 90 टक्के मालमत्तेचा हिशोब नाही, असं एसीबीचं म्हणणं आहे.
* आम्ही त्यांच्यासोबत आहोत – दरेकर
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, हा पूर्णपणे सूडभावनेने केलेला प्रकार आहे. पूजा चव्हाण प्रकरणी चित्रा वाघ जमिनीवर उतरुन आक्रमक पद्धतीने न्याय मागत आहेत. सरकारला त्या धारेवर धरत आहेत. सरकारच्या विरोधात बोललं की, जुन्या केसेस वर काढल्या जात आहेत. डिसमिस झालेल्या केसेस सूडभावनेतून वर काढल्या जात आहेत, असं दरेकर म्हणाले. एखाद्याच्या न्याय हक्कांसाठी लढलं की अशी मुस्कटदाबी केली जात आहे. चित्रा वाघ लढणाऱ्या नेत्या आहेत, त्या आणखी ताकतीने लढतील, आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असं ते म्हणाले.