सोलापूर : मेसच्या डब्यात मांसाहारी जेवण का आणले नाही? असा जाब विचारत पोलीस निरीक्षकाने डबेवाल्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी दिलेल्या निवेदनावरून पोलीस आयुक्तांनी चौकशी सुरु केली आहे. यामुळे पोलिस प्रशासनात खळबळ माजली आहे.
विजय रावसाहेब घोलप (रा. बापूजी नगर महिला आश्रमसमोर) यांचा खानावळीचा व्यवसाय आहे. ते दररोज डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालय येथील डॉक्टर, विद्यार्थी, ग्रामीण व शहर पोलीस कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना जेवणाचे डबे पुरवतात. ८ मार्च रोजी रात्री ९.४५ च्या सुमारास विजय घोलप हे नेहमीप्रमाणे डबे देण्यासाठी ग्रामीण पोलीस मुख्यालयात गेले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
डबे देऊन परत जात असताना महिला सुरक्षा विशेष कक्षातील पोलीस निरीक्षक शिरीष शिंदे यांनी विजय घोलप यांना अडवले व ‘मला मांसाहारी जेवणाचा डबा का आणला नाही?’ असे विचारत मागील पैशांच्या कारणावरून जाब विचारत मारहाण करण्यास सुरुवात केली.
* खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी
मारहाण केल्यानंतर ‘याची कोठेही वाच्यता केलीस तर तुला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून टाकेन’, अशी धमकीही पीआय शिरीष शिंदे यांनी दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. पोलीस निरीक्षक शिंदे हे पदाचा गैरवापर करत असून, त्यांच्यापासून मला माझ्या कुटुंबियांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता आहे. शिरीष शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व प्रशासकीय स्तरावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी विजय घोलप यांनी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे केली आहे. याची दखल घेत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलीस उपायुक्त दीपाली धाटे यांना याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.