मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटक प्रकरणात सचिन वाझे यांच्या चौकशीनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या हाती लागलेल्या माहितीनंतर अनेक खळबळजनक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे सरकार सावध झाल्याचे दिसत आहे. काहीवेळापूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट झाली आहे.
सचिन वाझे प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो किंवा मुंबई पोलिस आयुक्तांना पदावरून दूर केले जाऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. नाना पटोलेही मुख्यमंत्र्यांना भेटले. तसेच मंत्रिमंडळातील बदलासंदर्भात सोनिया गांधी, शरद पवार व उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे पटोलेंनी यांनी म्हटले.
एनआयएच्या तपासात सचिन वाझेंवर काही आरोप ठेवण्यात आले आणि त्यांना अटक करून निलंबित केले. अशा परिस्थितीत, ‘सचिन वाझेंना पाठीशी घालणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा’, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली.
“राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ‘जाणता राजा’ म्हणून ओळखले जाते. त्यांच्या पक्षाचा गृहमंत्री जर एखाद्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला पाठीशी घालत असेल तर ही खूपच खेदजनक बाब आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांचा राजीनाम घेतला गेलाच पाहिजे. किंवा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वत: नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे”, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या बैठकीत शिवसेना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. हे संपूर्ण प्रकरण हाताळण्यात गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख अपयशी ठरले. त्यामुळे त्यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारुन गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असे सरकारमधील काही नेत्याचे म्हणणे आहे.
त्यानंतर आज सायंकाळी काही वेळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीचे कारण जरी मंत्र्यांची झाडाझडती असल्याचे सांगण्यात येत असले तरी सचिन वाझे प्रकरणात महाविकास आघाडी सरकारचे पाय खोलात अडकल्याने या प्रकरणात डॅमेज कंट्रोल कशाप्रकारे करायचे, याविषयी चर्चा होणार असल्याचे कळते. तर अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यायचा की त्यांनाच कायम ठेवायचं यावर चर्चा होणार आहे.
तर दुसरीकडे गृहमंत्री अनिल देशमुख हे सुशांतसिंग राजपूत, पूजा चव्हाण आणि आता मनसुख हिरेन प्रकरण हाताळण्यात अपयशी ठरल्याचा ठपका सरकारमधील काही बड्या नेत्यांनी ठेवला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी गृहमंत्रीपद कोणा बड्या नेत्याकडे देण्याचे विचार करत आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे नावं आघाडीवर आहेत.
* गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नाही : जयंत पाटील
सचिन वाझे प्रकरणी ठाकरे सरकारच्या अडचणी संपताना दिसत नाहीत. मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात काही तास बैठक झाली. वाझे प्रकरणी ठाकरे सरकारची चांगलीच अडचण झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे गृहमंत्री बदललं जाण्याची जोरदार चर्चा आहे. त्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनिल देशमुखांची पाठराखण केली. अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नाही, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.