सोलापूर : सोलापुरात काल एका माजी नगरसेविकेविरुद्ध घरकुल प्रकरणात कोट्यवधींचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला तर आज बुधवारी दुपारी सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर मनोहर गणपत सपाटे यांच्याविरुद्ध खोटे,बोगस व बनावट कागदपत्रे तयार करून जागेची खरेदी करून शासनाची जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
यात हकीकत अशी की, मनोहर गणपत सपाटे (रा. हॉटेल शिवपार्वती,लकी चौक , सोलापूर) तसेच लता सुदाम जाधव ( रा.सोलापूर ) यांनी सन 1993 -94 या कालावधीमध्ये जमीन हडप करून भ्रष्टाचार केल्याची तक्रार फिर्यादी योगेश नागनाथ पवार (रा.अभिषेक पार्क ,सोलापूर ) यांनी केली होती.
माजी महापौर मनोहर सपाटे यांनी महापौर पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर हेतूने आणि संगनमताने खोटे बोगस व बनावट कागदपत्र तयार करून अभिषेक नगर ,मुरारजी पेठ येथील Tp 4 फायनल plot नंबर 106 क्षेत्र 7863 चौरस मीटर या जमिनीची शासकीय किंमतीच्या 25% रक्कम भरल्याचे खोटे दाखवले, तसेच सदर जागेची खरेदी करून ती जागा ताब्यात घेतली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शासनाची करोडो रुपयांची जमीन हडप करून भ्रष्टाचार केला आहे, असे फिर्यादी मध्ये नमूद करण्यात आले आहे. ती जागा खरेदी करताना संस्थेचे सदस्य नसताना खरेदी खतावर संस्थेचे सचिव म्हणून लता सुदाम जाधव यांनी सही करून संशयित आरोपी माजी महापौर मनोहर सपाटे यांना गैर कारभारात मदत केली म्हणून सदर बाजार पोलीसामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक कविता मुसळे अँटी करप्शन ब्युरो या करीत आहेत. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मनोहर सपाटे हे सोलापूरच्या राजकारणातील मोठे प्रस्थ आहे. राष्ट्रवादी पक्षात त्यांचे मोठे वजन आहे. पण इतके मोठे वजन असूनही महापालिका निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यामुळे अनेक वर्षापासून महापालिकेतील त्यांचे वर्चस्व संपले आहे.
* सरकी पेंड खरेदीत फसवणूक
सांगली येथील विद्यासागर खराटे आणि महेश खराटे यांनी 100 क्विंटल सरकी पेंड खरेदी करून त्यापोटी 1 लाख 35 हजार रुपये बँकेत जमा केले मात्र उर्वरित रक्कम न देता एक लाख 45 हजार रुपयांचा चेक दिला परंतु तो परत आल्यामुळे श्रीशैल सिद्रामप्पा माकडे यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे . या प्रकरणी पोलीस नाईक राठोड अधिक तपास करीत आहेत.