पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरेंनी काल मंगळवारी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. यावेळी राज यांनी मास्क परिधान केले होते. त्यामुळे दोघांच्या भेटीसोबतच राज ठाकरेंनी घातलेल्या मास्कचीही सर्वत्र चर्चा रंगली होती. पुण्यातील पर्वती परिसरात असलेल्या बाबासाहेबांच्या निवासस्थानी राज ठाकरेंनी ही भेट घेतली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येणाऱ्या पुणे महापालिका निवडणुकांसाठी चांगलेच मनावर घेतले आहे. नाशिक दौऱ्यानंतर राज सध्या पुण्यात आहेत. व्यस्त कार्यक्रम असूनही त्यांनी वेळात वेळ काढून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मात्र ही भेट मास्क घातल्यामुळे चर्चेत आली आहे. कारण राज ठाकरे यांनी दंड भरला पण मास्क घातला नसल्याचे वृत्त आहे. त्यांनी पहिल्यांदाच पुण्यात मास्क वापरला.
कोरोना विषाणूने हाहाकार माजवल्याने सर्वांनाच मास्क बंधनकारक केले आहे. मात्र, राज ठाकरे यांनी या नियमाला नेहमीच फाट्यावर मारल्याचे निदर्शनास आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला मास्क न लावता राज ठाकरेंनी उपस्थिती लावली. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यातही राज यांच्या तोंडावर मास्क नव्हता. मी मास्क लावणार नाही, अशी भूमिका त्यांनी वेळोवेळी घेतलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मात्र राज यांच्यावर मास्क लावण्याची वेळ आली आणि राज यांच्या तोंडावर मास्क पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* पण परत मास्क काढला
राज ठाकरे यांनी मास्क वापरला त्यामागे कारण काय होते. राज पुणे दौऱ्यादरम्यान बाबासाहेब पुरंदरे यांच्या भेटीला गेले. पुरंदरे यांचे घर पर्वती भागात असून तिथे पोहचल्यावर मास्क लावूनच राज यांनी पुरंदरे यांची भेट घेतली. कारण पुरंदरे यांचं वय व प्रकृतीच्या तक्रारी याचा विचार करता राज ठाकरेंनी मास्कचा नियम आवर्जून पाहिला. यातून बाबासाहेब पुरंदरे यांच्या तब्येतीच्या काळजीपोटी मास्क घातल्याचे जाणवत आहे.
तेथे दोघांमध्ये काहीवेळ चर्चा झाली. त्यानंतर राज ठाकरे तिथून निघाले. कारमध्ये बसताना राज ठाकरे यांनी आपल्या तोंडावरील मास्क काढून टाकला होता. हात उंचावून कारमध्ये बसून राज ठाकरे निघून गेले. यावरुन बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रकृतीच्या काळजीपोटी राज यांनी मास्क लावल्याचे म्हणावे लागले.
* आतापर्यंत राज ठाकरेंचा मास्कबाबतचा पवित्रा
राज ठाकरे हे मुंबईत दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आयोजित मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांनी तोंडाला मास्क लावला नव्हता. यावेळी ‘तुम्ही मास्क घातलेला नाही’, असं पत्रकारांनी विचारल्यावर ‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असं उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलं होतं. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उद्धव ठाकरेंनी ‘त्यांना माझा नमस्कार सांगा,’ असे उत्तर दिले होते.
राज ठाकरे यांनी कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून आतापर्यंत तोंडाला मास्क लावलेला दिसला नाही. अगदी मंत्रालयात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीलाही राज विनामास्कच गेले होते. साहजिकच राज ठाकरेंच्या तोंडाला मास्क नसलं की लोकांच्यामध्ये चर्चा रंगते. मार्च महिन्यात नाशिक दौऱ्यात त्यांनी स्वतः तर मास्क वापरलाच नाही, याउलट मनसेचे नेते आणि माजी महापौर अशोक मुर्तडक यांनाही मास्क हटवण्यास सांगितले होते.