बार्शी : कोरोना काळात घरात आश्रय दिल्याचा गैरफायदा घेवून एका खाजगी चालकाने महिला अधिकार्याला जीवे मारण्याची धमकी देवून वारंवार दुष्कर्म केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत पीडिताने दिलेल्या फिर्यादीवरुन बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
महेश नवनाथ करपे (रा. ममदापूर ता. बार्शी ) असे आरोपीचे नाव आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये आरोपी हा पिडितेच्या खाजगी गाडीवर बदली चालक म्हणून गेला होता. या दरम्यान तो कोरोनाबाधित झाल्याने त्यास त्याच्या घरमालकाने हाकलून दिले होते. त्यामुळे त्याने पिडिता व तिच्या वडिलांकडे काही दिवस घरात राहू देण्याची विनंती केली. त्यांनी आश्रय दिल्यानंतर त्याने पीडितेच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देवून रात्री तिच्याशी दुष्कर्म केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एके रात्री तो पिडितेच्या खोलीकडे जात असताना तिच्या वडिलांनी पाहिल्यानंतर त्यास हाकलून दिले. त्यानंतर त्याने पिडितेला गाठून बदनामी करण्याची धमकी देवून तिच्याकडून 30 हजार रुपये उकळले. काही दिवसांनी पिडिता आपल्या कार्यालयात गेली असता त्याने तिचा पत्ता मिळवून कार्यरत असलेल्या कार्यालयामध्ये जावून तिला धमकावून एक लाख रुपयाची मागणी केली. पिडितेची बदली झाल्यानंतर नवीन नियुक्तीच्या ठिकाणी ती राहत असलेल्या घराजवळच त्याने खोली केली आणि धमकी देवून वारंवार बोलावून विविध लॉजमध्ये नेऊन तिच्याशी दुष्कर्म केले.
त्यावेळी त्याने एकांतातील काही फोटो आणि व्हिडीओ तयार केले. तिला वारंवार मारहाण, शिवीगाळ करु लागला. तिच्या कार्यालयात जावून तू नवर्याला घटस्फोट दे आणि माझ्याशी लग्न कर अशी मागणी करु लागला. त्याच्याकडून होणारा त्रास असह्य झाल्यानंतर तिने आपल्या पतीच्या कानावर सर्व प्रकार घातला आणि त्याच्याविरुध्द पोलिसांमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्याने पिडितेच्या भावजयीला काही अश्लील फोटो पाठविले आणि तो पीडितेच्या वडिलांच्या घराजवळ राहण्यास गेला. त्यामुळे पिडितेला आपल्या वडिलांना त्याच्याकडून धोका होण्याची भीती वाटू लागली. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.