बार्शी : तालुक्यातील वैराग येथे आई-वडिल कामास गेल्यानंतर घरी एकटाच असलेला आठ वर्षाचा शिवराज जोतीराम सुतार हा काल शनिवारी दुपारी 3.30 वाजल्यापासून गायब झाला आहे. परिसरात, नातेवाईकांकडे शोध घेवूनही तो न सापडल्याने त्याच्या आईने वैराग पोलिस ठाण्यात मुलाचे अपहरण झाल्याची फिर्याद दिली आहे.
चोवीस तासानंतरही त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे नातेवाईक चिंतित झाले आहेत.
मूळचे मोहोळ तालुक्यातील वाळूज येथील असलेले सुतार दांपत्य उदरनिर्वाहासाठी गेल्या काही वर्षापासून वैराग येथील जंगले गल्लीमध्ये भाड्याने राहत आहे. शिवराज हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. मुलगा चुणचुणीत आणि धीट असल्यामुळे आई-वडिल त्याला घरात एकटे ठेवून कामास जात.
दिवसभर तो गल्लीतल्या मुलांसमवेत खेळत असे. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी 8 च्या सुमारास मजुरीच्या कामानिमित्ताने ते दोघेही घराबाहेर पडले. त्यावेळी शिवराज घरातच होता. आई रुपाली दुपारी 4 च्या सुमारास कामावरुन परतल्यानंतर घराला कुलूप असल्याचे तिला दिसले. त्यामुळे तिने घरमालकीण नानी जाधव यांच्याकडे विचारपूस केली असता 3.30 वाजता कुलूप लावून शिवराज बाहेर गेल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर त्यांनी आपल्या परिचित व इतर ठिकाणी त्याचा शोध घेतला पण तो सापडला नाही. शिवराजला खाजगी शिकवणीचे शुल्क भरण्यासाठी पालकांनी सकाळी 100 रु. दिले होते. तो मित्रांसमवेत त्याच्या आजोळी वाळूज येथे जाण्यासाठी खाजगी वाहनाने गेला होता मात्र रस्त्यातूनच परतला. त्यानंतर त्याला गाव तळ्याकडे जाताना पाहिल्याचे सांगण्यात येत आहे. तपासाधिकारी राजेंद्र राठोड हे बाहेरगावी असल्यामुळे तपास अजुन पुढे सरकलेला नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* पोलीस शिपायाचे घर दिवसा फोडून चोरट्याने रोख रकमेसह साडेतीन लाखाचे दागिने पळविले
सालापूर – ग्रामीण पोलीस दलातील शिपायाचे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने रोख रकमेसह ३ लाख३५ हजाराचे दागिने पळविले. ही चोरी केम (ता.करमाळा) येथे शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. चोरट्याने पोलिसांचे घर दिवसा फोडल्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.
केम (ता.करमाळा) येथे किशोर शिवाजी तळेकर हे पोलीस शिपाई राहण्यास असून, ते टेंभुर्णी येथे नेमणुकीस आहेत. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामाला गेले होते. दुपारी एक ते चार या दरम्यान चोरट्याने यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरुमच्या कपाटा मधील रोख १५ हजार रुपये आणि १०० ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण३ लाख 35 हजाराचा ऐवज पळविला. हा प्रकार घडल्यानंतर किशोर तळेकर यांनी करमाळा पोलिसात चोरीची फिर्याद दाखल केली. पुढील तपास फौजदार प्रवीण साने हे करीत आहेत.