सोलापूर : शेत जमिनीच्या भांडणातून विरोधकांची बाजू घेतल्याचा राग धरून ऊस पिकाला आग लावल्याने एकूण ७ शेतकऱ्यांचे १२ एकर ऊस जळून खाक झाला. ही घटना लव्हे (ता. माढा) येथे शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणात कुर्डूवाडीच्या पोलिसांनी शुभम गोरख बागल (वय ३० रा. लव्हे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
शेतजमिनीच्या वादातून संशयित आरोपी शुभम बागल आणि गावातील तानाजी लुंगसे यांच्यात भांडण झाले होते. त्यावेळी अमीन सय्यद यांनी लुंगसे याची बाजू घेतली होती. त्याचा राग धरून शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शुभम बागल याने अमीन सय्यद यांच्या शेताला आग लावली. ती आग पसरत जाऊन शेजारी राहणारे मुमताज सय्यद, फरीद सय्यद, वसीम सय्यद, मिरावली सय्यद, संदिपान मुरलीधर आणि निजाम सय्यद अशा एकूण ७ शेतकर्यांचे १२ एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
सय्यद यांच्या शेताला आग लावल्यानंतर आरोपी शुभम बागल हा पळून जात होता. त्यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला पाहिले होते, अशा आशयाची फिर्याद अमीन रशीद सय्यद( रा. लव्हे) यांनी कुर्डूवाडी पोलिसात दाखल केली. हवालदार घाडगे पुढील तपास करीत आहेत.
* कुंभारी येथे मारहाण २महिलांसह ५ जखमी
सोलापूर : कुंभारी (ता.दक्षिण सोलापूर) येथे भावकीत असलेल्या शेतातील वाटेच्या वादातून दगड आणि काठीने केलेल्या मारहाणीत दोन महिलांसह पाच जण जखमी झाले. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मल्लेशी गेनप्पा रेड्डी (वय ६५) त्यांची पत्नी विठाबाई, मुलगा शशिकांत (वय३२), तुकाराम रेड्डी (वय६०) आणि त्यांची पत्नी चतुराबाई (सर्व रा. कुंभारी) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यांना इरेश बसवराज रेड्डी आणि अन्य १३ जणांनी मारहाण केली. अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
* हॉटेलमध्ये मारहाण एक जखमी
अक्कलकोट रोडवरील मधुबन हॉटेल मध्ये रूमचे भाडे देण्याच्या तक्रारीवरून काठी आणि लाथाबुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत किरण बाळू शिंदे (वय २८ रा. गांधीनगर) हा जखमी झाला. ही घटना रविवारी सायंकाळी च्या सुमारास घडली. त्याला गंगाधर नावाच्या इसमाने मारहाण केली. अशी नोंद एमआयडीसी पोलिसात झाली आहे .
* नागणसूर येथे आत्महत्येचा प्रयत्न
नागणसूर (ता.अक्कलकोट) येथे राहणाऱ्या श्रीकांत गडेप्पा मुजगोंडा (वय२९) या तरूणाने राहत्या घरात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मागचे कारण समजले नाही. तालुका पोलिसात यांची नोंद झाली आहे .