सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर एसटी कार्यशाळेतील कर्मचाऱ्याने आर्थिक चणचणीला कंटाळून राहत्या घरी आत्महत्या केली. दशरथ गिड्डे असं या आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. त्यांनी आपल्या पत्नीला मॉर्निंग वॉकला जाण्यास सांगितले. पत्नी बाहेर गेल्यानंतर दशरथ यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, राज्य शासनाला अजून अशा किती आत्महत्या पाहायच्या आहेत, असा संतप्त सवाल कर्मचाऱ्यांनी केला आहे. कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने एसटी विभागामध्ये खळबळ उडाली आहे.
दशरथ गिड्डे (वय ४२) या कर्मचाऱ्याने राहत्या घरी आज बुधवारी पहाटे गळफास लावून आत्महत्या केली आहे. दशरथ गिड्डे हे पंढरपूर येथील एसटी आगारात यांत्रिकी विभागात सहाय्यक मेकॅनिक म्हणून गेल्या तीन वर्षांपासून काम करत होते. आज पहाटे त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले आहेत.
मूळचे मोहोळ येथील असलेले दशरथ गिड्डे हे मागील काही दिवसांपासून मानसिक तणावामध्ये होते. त्यातूनच त्यांनी ही आत्महत्या केली असावी, अशी शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने कर्मचारी तणावात आहेत. त्यातूनच अनेक ठिकाणी आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आतापर्यंत तब्बल २७ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. यातून एसटी महामंडळ तोट्यात असल्यामुळे कर्मचाऱ्यांची असलेली भयाण परिस्थिती दिसून येत आहे. पहिली आत्महत्या ७ मार्च २०२० रोजी झाली होती त्यानंतर हे आत्महत्यांचे सत्र असेच सुरू असून महामंडाळाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. गिड्डे आणि गवळी यांच्या आत्महत्येनंतर कर्मचाऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
बीड आगारातील चालक तुकाराम सानप यांनी सोमवारी (११ ऑक्टोबर) राहत्या घरात कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. कर्मचाऱ्यांचे वेतन वेळच्या वेळी मिळत नसल्यामुळे कुटुंबाच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी हे कर्मचारी कर्ज घेतात आणि नंतर हतबल कर्मचारी आत्महत्येचे पाऊल उचलतात.
पंढरपूर आगारातील दशरथ गिड्डे यांनीही आर्थिक समस्यांना कंटाळून आज (१३ ऑक्टोबर) आत्महत्या केली. तुळजापूर जुने बस स्थानक येथेही आज दयानंद गोविंदराव गवळी हे मयत आढळून आल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप आहे.