नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर आज केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिल्लीतल्या एम्समध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी सिंग यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन मनमोहन सिंग लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना केली. दरम्यान सिंग यांना बुधवारी एम्समध्ये आणण्यात आले.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मनमोहन सिंग यांना ताप येत होता. तापानंतर थकवा जाणवत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना काल बुधवारी संध्याकाळी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग सध्या राजस्थानचे राज्यसभा सदस्य आहेत. सिंग 2004 ते 2014 पर्यंत पंतप्रधान होते.
दरम्यान, मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, ‘मनमोहन सिंग यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि ते लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो.’ माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना दोन दिवसांपूर्वी ताप आला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यानंतर त्यांना थकवा जाणवू लागला. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर तात्काळ त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या एम्समधील कार्डियो टॉवरमध्ये डॉ. नितीश नायक आणि त्यांच्या टीमच्या निरीक्षणाखाली मनमोहन सिंग यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
मनमोहन सिंग 88 वर्षांचे आहेत आणि ते साखरेच्या आजारानेही त्रस्त आहेत. माजी पंतप्रधान सिंग यांच्यावर दोन बायपास शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या आहेत. त्यांची पहिली शस्त्रक्रिया 1990 मध्ये युनायटेड किंगडममध्ये करण्यात आली. तर 2009 मध्ये त्यांची दुसरी बायपास शस्त्रक्रिया एम्समध्ये करण्यात आली. गेल्या वर्षी, एका नवीन औषधामुळे रिअॅक्शन आणि ताप आल्यानंतरही मनमोहन सिंग यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. कित्येक दिवसानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
89 वर्षीय मनमोहन सिंग यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना एम्स रुग्णालयामध्येच दाखल करण्यात आले होते. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती. कोरोनावर मात करून मनमोहन सिंग घरी देखील परतले होते. दरम्यान, मनमोहन सिंग हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि सध्या ते राजस्थानचे राज्यसभा सदस्य आहेत. 2004 ते 2014 पर्यंत ते देशाचे पंतप्रधान राहिले होते. 2009 मध्ये एम्समध्ये त्यांची बायपास शस्त्रक्रिया झाली होती.