भोपाळ : मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये काल रविवारी वेब सिरीज ‘आश्रम’च्या सेटवर हल्ला करण्यात आला आहे. बजरंग दलाने हा हल्ला केल्याचा आरोप आहे. ‘आश्रम’ चे दिग्दर्शक प्रकाश झा यांना धक्काबुक्की करण्यात आली, त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकण्यात आली. या वेब सिरीजचे नाव बदलण्यात यावे, अशी मागणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. हा शो हिंदुत्वाला बदनाम करण्यासाठी आहे, असाही आरोप करण्यात आला आहे.
चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते प्रकाश झा यांच्यावर हल्ला करण्यात आला असून चेहऱ्यावर शाई फेकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रकाश झा यांच्या ‘आश्रम-३’ या वेबसीरिजच्या चित्रीकरणस्थळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. भोपाळमध्ये हे चित्रीकरण सुरू होते. ‘आश्रम-३’ या नावाला आक्षेप घेत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चित्रीकरणस्थळी जाऊन राडा घातला. त्यांनी चित्रीकरणस्थळी तोडमोड करून प्रकाश झा यांच्यावर शाई फेकली.
तेथे उपस्थित काहीजणांनी मोबाइलमध्ये व्हिडीओ शूट केले असून यामध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते हातात काठ्या घेऊन राडा घालताना दिसत आहेत. यावेळी एकाला मारहाण केली जात असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.
हिंदूंची चुकीची प्रतिमा तयार करण्यात आल्याचा आरोप करत बजरंग दलाने या वेबसीरिजचे चित्रीकरण चालू देणार नाही, असा इशाराही दिला आहे. या वेब सीरिजचं नाव बदलण्यात यावं अशी मागणीही त्यांनी केली आहे. बजरंग दलाचे कार्यकर्ते यावेळी ‘प्रकाश झा मुर्दाबाद’, ‘बॉबी देओल मुर्दाबाद’ आणि ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देत होते.
https://twitter.com/Karth1keyan/status/1452516594337271809?t=sx-Z5isNRUg7OVycoFGw5g&s=19
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“त्यांनी आश्रम १, आश्रम २ तयार केला आणि आता तिसऱ्या सीझनची शूटिंग करत आहेत. महिलावंर गुरु अत्याचार करत असल्याचं त्यांनी यामध्ये दाखवलं आहे. चर्च किंवा मदरसावर असा चित्रपट करण्याची हिंमत त्यांच्यात आहेत का? ते स्वत:ला कोण समजतात?,” अशी विचारणा बजरंग दलाने केली आहे.
गुरूंनी महिलांवर अत्याचार केल्याचे मालिकेच्या पहिल्या दोन भागांत दाखविण्यात आले आहे. यामुळे हिंदुत्वाचा अपमान झाल्याचे या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. अभिनेता बॉबी देओल कुठे आहे असा जाब विचारीत त्यांनी सेटवरील कर्मचाऱ्यांचा पाठलाग केला. यातील एकाला लोखंडी स्टँडने बेदम मारहाण करण्यात आली.
“बजरंद दल त्यांना आव्हान देत आहे की, आम्ही त्यांना शूटिंग करु देणार नाही. आम्ही सध्या फक्त प्रकाश झा यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली आहे. आम्ही बॉबी देओलच्या शोधात आहोत. त्याने आपल्या भावाकडून काहीतरी शिकलं पाहिजे. त्याने किती देशभक्तीपर चित्रपट काढले आहेत,” असंही यावेळी त्यांनी म्हटलं.
दरम्यान प्रकाश झा यांच्या टीमकडून कोणीही अद्याप तक्रार दिली नसली तरी सहभागी असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे. “शूटिंगमध्ये बाधा आणणाऱ्या आणि संपत्तीचं नुकसान करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल. त्यांना अटक केलं जाणार,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.