सोलापूर : सोलापूर बार असोसिएशनच्या चुरशीच्या निवडणुकीत विधी विकास पॅनलचे अध्यक्षपदी ॲड. नीलेश ठोकडे, उपाध्यक्षपदी ॲड. नीलेश जोशी, खजिनदारपदी ॲड. चंद्रसेन गायकवाड यांची निवड झाली तर सचिवपदी परिवर्तन पॅनलचे ॲड. अविनाश बिराजदार यांची निवड झाली आणि सहसचिवपदी ॲड. अलका मोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
काल बुधवारी झालेल्या निवडणुकीत विधी विकास पॅनलचे वर्चस्व दिसून आले. सचिवपद सोडून इतर सर्व पदांवर विकास पॅनलचे उमेदवार निवडून आले. असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीसाठी चुरशीने मतदान झाले. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरु होती.
वकिलांच्या बार असोसिएशनच्या निवडणुकीत अॅड. निलेश ठोकडे यांनी अॅड. सुरेश ऊर्फ बापू गायकवाड यांचा १६५ मतांनी पराभव करीत अध्यक्षपद मिळविले. ठोकडे यांच्या पॅनेलने अॅड. गायकवाड यांच्या पॅनेलचा धुव्वा उडवला.
सचिव पदासाठी उभारलेल्या ठोकडे पॅनेलचा उमेदवार पराभूत झाला. अटीतटीच्या लढतीत शेवटच्या क्षणापर्यंत अॅड. गायकवाड यांना विजयाची आशा होती. परंतु, ठोकडे यांनी सुरुवातीपासूनच वर्चस्व कायम राखले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बार असोसिएशनसाठी अॅड. ठोकडे व ऍड. गायकवाड यांचे स्वतंत्र पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. प्रचाराच्या सुरवातीला अॅड. गायकवाड यांनी आघाडी घेतली होती. परंतु, सहसचिव अॅड. अलका मोरे या बिनविरोध झाल्यानंतर तोच आमच्या विजयाचा शुभशकुन असल्याचे ठोकडे यांनी स्पष्ट केले होते आणि तेच खरे ठरल्याचे निकालानंतर पहायला मिळाले.
सचिवपदासाठी ठोकडे यांच्या पॅनेलमधून अॅड. मनोज पामूल हे निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु, त्यांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे पॅनेलप्रमुख अॅड. गायकवाड यांच्यासह उपाध्यक्षपदासाठी उभारलेल्या अॅड. आसिम बांगी, ऍड. श्यामराव बिराजदार, अॅड. आनंद काळे यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच खजिनदार पदासाठी निवडणूक लढविणारे ऍड. दयानंद माळी यांचा पराभव ठोकडे यांच्या पॅनलचे उमेदवार अॅड. चंद्रसेन गायकवाड यांनी केला. दरम्यान, वकिलांच्या प्रश्नावर आपण सातत्याने काम करू, अशी प्रतिक्रिया बार असोसिएशनचे नूतन अध्यक्ष अॅड. ठोकडे यांनी दिली.
यात विधी विकास पॅनलचे अॅड. ठोकडे यांना ६४९, अॅड. निलेश जोशी यांना ३८७, अॅड. चंद्रसेन गायकवाड ६००, अॅड. मनोज पामूल यांना ४९७ मते, तर परिवर्तन पनलर्च अॅड. सुरेश गायकवाड यांना ४७६, अॅड. आसिम बांगी ३८२, अॅड. अविनाश बिराजदार ६०५, अॅड. दयानंद माळी यांना ५१० मते मिळाली. विधी विकास पॅनलसाठी अॅड. मिलिंद थोबडे, अॅड. उमेश मराठे यांनी परिश्रम घेतले. निकाल जाहीर होताच उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला.
मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. बसवराज सलगर यांनी काम पाहिले तर अॅड. विनयकुमार कटारे, अॅड. रेवण पाटील, अॅड. मयूरेश शिंदे देशमुख, ॲड. काशिनाथ सुरवसे, अॅड. प्रकाश अभंगे, अॅड. गणेश पवार, अॅड. अभिषेक बुगडे, अॅड. हेमंतकुमार साका यांनी मदत केली.
* तर आम्ही विजयी ठरलो असतो
निवडणूक निर्णय अधिकारी तथा तत्कालीन अध्यक्ष ऍड. बसवराज सलगर म्हणाले, बार असोसिएशनच्या निवडणुकीत एकूण एक हजार १२८ जणांनी मतदान केले. दरम्यान, या निवडणुकीत सर्वांनीच मतदानाचा हक्क बजावला असता, तर आम्ही विजयी ठरलो असतो, असा दावा पराभूत पॅनलकडून करण्यात आल्याची चर्चा मतमोजणीनंतर रंगली होती.