बार्शी : बार्शी – वैराग रस्त्यावर झालेल्या ऊस वाहतुकीचा ट्रॅक्टर आणि कांदे वाहणार्या टेंपोच्या धडकेत टेंपो चालकाचा गंभीर जखमी होवून जागेवरच मृत्यू झाला तर कांदे मालकाला जबर मानसिक धक्का बसला आहे.
याबाबत ट्रॅक्टर चालक परमेश्वर लक्ष्मण वागदरी (रा. व्हळे ता. माढा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन टेंपोचालक मयत समाधान ज्ञानोबा जाधवर (रा. वालवड ता. बार्शी) याच्याविरोधात हयगयीने, अविचाराने , रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने टेंपो चालवून ट्रॅक्टरला धडक देवून दोन्ही वाहनांचे सुमारे साडे आठ लाख रुपयांचे नुकसान करुन स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माढा तालुक्यातील सापटणे (भोसे) येथील बालाजी गणपत गिड्डे यांचा ट्रॅक्टर पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यास ऊस वाहतूकीसाठी लावण्यात आलेला आहे. या कारखान्याची तोड सध्या मौजे पिंपरी (पां.) येथील रणजित शांताराम काशिद यांच्या शेतात चालू आहे. वागदरी हे त्यावर चालक म्हणून काम करतात.
Tempo driver killed in accident after hitting sugarcane tractor
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
संध्याकाळी 7 च्या सुमारास दोन ट्रॉली भरुन ऊस घेवून ते कारखान्याकडे निघाले होते. वैराग-बार्शी रस्त्यावर मानेगाव शिवारातून प्रसाद लॉजच्या जवळून ते रात्रौ 10.15 च्या सुमारास जात असताना भरधाव वेगाने चुकीच्या बाजूने येवून टेंपो त्यांच्या ट्रॅक्टरच्या मागील चाकास धडकला. टेंपो येत असलेला पाहून त्यांनी ट्रॅक्टरमधून उडी टाकून आपला जीव वाचवला. मात्र टेंपो चालक जाधवर हा अपघातानंतर टेंपेा आणि ट्रॉलीच्या दरम्यान अडकून जागेवरच ठार झाला. तर त्याच्या शेजारी बसलेल्या रणजित विलास जगदाळे (रा. चारे ता. बार्शी) यास अपघाताचा जबर मानसिक धक्का बसला.
□ लवंगी येथे तलवारीने हल्ला, सांगली जिल्ह्यातील तिघे जखमी चौघांविरुद्ध गुन्हा
सोलापूर – बबलाद (ता.जत जि.सांगली) येथील भावकीतील शेत जमिनीच्या वादातून तलवारीने केलेल्या हल्ल्यात तिघे जण गंभीर जखमी झाले.
लवंगी (ता.माळशिरस) येथील चव्हाणवस्ती जवळ घडली. जखमींमध्ये दयानंद मल्लेशअप्पा बरुर (वय ४०) विठ्ठल बरूर आणि महादेव बरूर (रा.बबलाद) असे तिघे जण जखमी झाले. या प्रकरणात मंगळवेढ्याच्या पोलिसांनी रेवणसिद्ध अप्पाराया बरुर, अप्पाराया बरूर, आणि सिद्धराया बरुर (सर्व रा. बबलाद ता.जत)या तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यापैकी दोघांना पोलिसांनी बुधवारी अटक केली.
रविवारी (ता. 27) सायंकाळच्या सुमारास लवंगी शिवारातील चव्हाण वस्ती जवळ वरील आरोपींनी शेतातील वाटेच्या कारणावरून तिघांवर तलवारीने प्राणघातक हल्ला केला.सर्व जखमींना सांगली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पुढील तपास सहायक निरीक्षक आवटे करीत आहेत.