● हवेत आपला फवारा नका मारू
सोलापूर :– आपलं शहर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येक सोलापूरकर नागरीकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळले पाहिजे तरच शहराचा नावलौकीक वाढेल, असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर यांनी केले.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने नो स्पीट मोहिम राबवण्यात आली त्याच अनुषंगाने शहरातील जवळपास 5 हजार रिक्षांवर जनजागृतीसाठी थुंकु नका चे स्टिकर लावण्याचा शुभारंभ रेल्वेस्टेशन येथील रिक्षा थांब्यावर डॉ.वैशाली कडुकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्ष डॉ.मिलिंद शहा, सचिव डॉ. तन्मंगी जोग, सचिव डॉ. संजय मंठाळे आदी उपस्थित होते.
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास टिबीचा प्रसार होतो. त्यामुळे मानवी जीवन धोक्यात येते. अनेक शासकीय कार्यालये, खाजगी कार्यालयात ठिक ठिकाणी थुंकल्याचे दिसून येते तसेच रस्त्यावरून जाताना अनेकजण हवेत आपला फवारा मारतात. त्यामुळे इतरांना त्याचा त्रास होतो. रोग पसरतात तर कधी कधी मोठे वाद भांडण होतात. या सर्वांवर एकच उपाय म्हणजे थुंकू नये प्रत्येकाने आपले कर्तव्य आणि जबाबदारी म्हणून या नो स्पीट मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
Don’t spit in public places, stickers affixed on five thousand rickshaws in Solapur for awareness
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून हा चांगला उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यामुळे सोलापूर आणि येथील नागरीकांना त्याचा फायदा होणार आहे, असेही डॉ. कडुकर यांनी सांगितले.
प्रारंभी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.मिलिंद शहा यांनी नो स्पीट मोहिमेची माहिती दिली.
सोलापूरचे तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला त्याचाच भाग म्हणून शहरातील सर्व रिक्षांवर नो स्पीटचे स्टिकर लावण्यात आले आहेत, असेही डॉ.मिलिंद शहा यांनी सांगितले.
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छ केल्यास रोगांचा प्रसार जलद होतो. त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनकडून हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे सचिवा डॉ.तन्मंगी जोग यांनी सांगितले. त्यानंतर रेल्वेस्टेशन परिसरातील रिक्षा स्टॉपवरील सर्वच रिक्षांवर न थुंकण्याचे आवाहन करणारे स्टिकर लावण्यात आले.
यावेळी डॉ. शांतीलाल सेठीया, रिक्षा संघटनेचे चंद्रकांत गायकवाड, पवार यांच्यासह रिक्षा चालक आणि रेल्वेचे अधिकारी आदी उपस्थित होते. शेवटी इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. संजय मंठाळे यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.