पंढरपूर : पंढरपूर शहरातील नवीन कराड नाकाजवळील एका जीममधील प्रशिक्षकाने जिममध्ये येणाऱ्या अनेक महिला व मुलींचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सदर प्रशिक्षकास अटक केली असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, एका कुटुंबातील पती पत्नीने आपली शारीरिक तंदुरुस्ती चांगली रहावी म्हणून पंढरपूर येथील एका नामांकित जीम मध्ये 18 जानेवारी 2022 रोजी पासून जाणे चालू केले होते. त्यांनी जीम मध्ये प्रवेश घेताना त्यांचे मोबाईल नंबर जीममध्ये दिलेले होते. सुरवातीस जीम मधील प्रशिक्षक श्रीकांत राजू गायकवाड (रा. पंढरपूर) याने डायटस घेण्याची माहिती देणेसाठी विवाहित स्त्रीस तिचे मोबाईलवर फोन करण्यास सुरवात केली.
त्यानंतर श्रीकांत गायकवाड याने या स्त्रीच्या मोबाईल फोनवर कॉल करुन तसेच व्हॉट्सअप मेसेज करुन तिचेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करु लागला. त्याचवेळी या स्त्रीने त्यास तुम्हाला ज्या कांही सूचना द्यावयाच्या असतील त्या आम्ही जीममध्ये आल्यावर देत जा, असे सांगितले. तरी देखील श्रीकांत गायकवाड हा वेळी अवेळी मोबाईलवर कॉल करणे, वॉटसअप मेसेज, व्हॉटसअप व्हिडीओ कॉल करणे, इन्टाग्राम चॅटींग, फेसबुक चॅटीग ,स्नॅपचॅट अशा प्रकारे चॅट करून जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता.
विवाहित स्त्रीचे पती ज्यावेळी कामानिमित्त बाहेर असताना ती एकटी जीममध्ये जात होती. त्यावेळी त्या संधीचा फायदा घेवून श्रीकांत गायकवाड हा या विवाहित स्त्रीकडे वाईट नजरेने पाहणे तसेच व्यायामाच्या सूचना देण्याचा बहाणा करुन वाईट हेतूने तिचे अंगाला स्पर्श करणे असे प्रकार करत होता. श्रीकांत गायकवाड याच्याकडून या होत असलेल्या कृत्याबाबत या विवाहित स्त्रीने पतीस सांगितले.
Gym instructor commits sexual harassment of women and girls in Pandharpur; Gym instructor arrested
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
यामुळे त्या दोघांनी जिम सोडण्याचा निर्णय घेतला व जीममध्ये जाणे बंद केले. त्यानंतर आरोपी गायकवाडने पिडीत स्त्रीला तीचे व्हॉट्सअप चॅटींग,फोटो तिच्या पतीला दाखवण्याची धमकी वेळोवेळी दिली. परंतू पिडीत स्त्रीने आरोपी श्रीकांत राजू गायकवाड याचे पासून होत असलेला त्रास तीला असहय झाल्याने पिडीत स्त्रीने आपले पती समवेत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात येवून श्रीकांत राजू गायकवाड (रा.पंढरपूर ) याच्याविरोधात विरोधात तक्रार दिली.
यावरून पंढरपूर शहर पोलीस ठाणेत गुन्हा रजि क्र 264/2022 भारतीय दंड संहिता कलम 354, 354(अ),354(क),354 (ड), 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे .सध्या आरोपी पेालीस कोठडीमध्ये आहे. तपासात या अटक आरोपीने पंढरपूर शहरातील वेगवेगळ्या जीममध्ये तसेच सध्या कार्यरत असलेल्या जीममध्ये प्रशिक्षक म्हणून काम करत असताना ब-याच महीला व मुलींची लैंगीक छळवणुक केली असल्याची माहिती समोर आली आहे.
महिला व मुलींना गोड बोलून, त्यांची स्तुती करून व त्यांच्याशी मोबाईलद्वारे चॅटींग करून त्यांना अलगदपणे त्यांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपी श्रीकांत राजू गायकवाड (वय 26 वर्षे रा. पंढरपूर) याचेकडून महिला व मुली यांची छळवणूक झाली असल्यास या आरोपी विरोधात तक्रार देण्यासाठी पुढे यावे. तक्रारदाराचे नांव पत्ता गोपनीय ठेवणेत येईल, असे पंढरपूर शहर पोलीस ठाणेे तर्फे आवाहन करण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पो नि अरुण पवार, मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाचे प्रशांत भागवत, दत्तात्रय आसबे, पोना प्रसाद औटी, निलेश कांबळे, अरबाज खाटीक, मपोना निता डोकडे, मपोकॉ कुसुम क्षिरसागर, चापोहेकॉ अविनाश रोडगे यांनी केली आहे.