सोलापूर : सोलापूर शहरात एका पादचारी व्यक्तीस क्रेनने जोराची धडक दिली. यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना काल सोमवारी रात्री घडली. क्रेन चालकाने अपघात होताच पलायन केले.
पायी चालत जाणाऱ्या एकास क्रेनने जोराची धडक दिल्याने जखमी होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोलापूर शहरातील मरिआई चौकाकडून डोणगाव रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर काल सोमवारी रात्री (ता. ११ ) आठच्या सुमारास घडली.
अविनाश गजेंद्र बोबडे (वय ५७ रा. जुनी लक्ष्मी चाळ, डोणगाव रोड) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी रात्री मयत अविनाश बोबडे हे मरीआई चौकाकडून पायी चालत जुनी लक्ष्मी चाळ येथील मधल्या वाटेने जात होते. त्यावेळेस समोरुन वेगाने येणाऱ्या MH१३ सी एस १२३७ क्रेनने पायी चालणाऱ्या बोबडे यांना जोराची धडक दिली. या धडकेत बोबडे उडून बाजूला पडले, अपघात झाल्याचे समजताच क्रेन चालक क्रेन सोडून पळून गेला.
परिसरातील नागरिकांनी जखमी बोबडे यांना रिक्षात घालून उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. जोपर्यंत क्रेन चालकाला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली असता पोलिसांनी तातडीने चालकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
One killed in crane crash in Solapur city; In Sangola, a child drowned in a swimming tank
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ वडिलांच्या वाढदिवसादिवशी मुलाचा स्वीमिंग टँकमध्ये मृत्यू
सोलापूर : वडिलांच्या वाढदिवसादिवशी मुलाचा स्वीमिंग टँकमध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोलापुरात घडली आहे.
निगडी खुर्द (ता. जत) येथील पृथ्वीराज प्रमोद कोडग (वय १८) याचा सांगोला (जि.सोलापूर) येथील एका स्वीमिंग टँकमध्ये रविवारी (ता. 10) सकाळी बुडून मृत्यू झाला. पृथ्वीराज कोडग हा लोहगाव (ता. जत) येथील शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक समितीचे नेते प्रमोद कोडग यांचा मुलगा होता. प्रमोद कोडग यांचा रविवारी वाढदिवस होता. याच दिवशी त्यांच्या मुलाचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
काही कामानिमित्त कोडग यांचे कुटुंब सांगोला येथे वास्तव्यास आहे. पृथ्वीराजने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो दोन मित्रांसह सांगोला येथील स्वीमिंग टँकमध्ये पोहण्यास गेला होता. सर्वजण पोहण्यात व्यस्त होते. यावेळी पृथ्वीराज पाण्याच्या बाहेर उशिरापर्यंत आला नाही.
म्हणून सोबतच्या मित्राने याबाबतची माहिती स्वीमिंग टँक चालकाला दिली. यावेळी त्यांनी पृथ्वीराज बाहेर गेला आहे की नाही याबाबतची सीसीटीव्हीमध्ये पाहणी केली असता, तो बाहेर गेला नसल्याचे लक्षात आले. संशय आल्याने टँकमधील पाणी उपसले. यावेळी पृथ्वीराज मृतावस्थेत आढळून आला.
यावेळी पृथ्वीराजला पोहण्यासाठी संरक्षणासाठी लाईफ जॅकेट दिली नसल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, स्वीमिंग टँक चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप पृथ्वीराज कोडगच्या नातेवाइकांनी केला आहे.