□ बारा वर्ष सैन्यदलामध्ये सेवा बजावली, गृहप्रवेशाचे स्वप्न अधुरे राहिले
बार्शी : मूळचे बार्शी तालुक्यातील रातंजन येथील असलेले व सध्या उत्तराखंड राज्यामध्ये कार्यरत असलेले जवान गोरख हरीदास चव्हाण यांना अपघातात वीर मरण आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, 8 वर्षाचा मुलगा, 3 वर्षाची मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त येथे पोहचताच रातंजनमध्ये शोककळा पसरली.
गोरख चव्हाण हे बॉर्डर रोड ऑर्गनायजेशनमध्ये चालक या पदावर कार्यरत होते. उत्तराखंडमध्ये बीआरओच्या ताफ्यातील गाडी दरीत कोसळली आणि त्यात त्यांना वीर मरण आले. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण रातंजन (ता .बार्शी ) येथे मूळ गावी झाले तर उच्च माध्यमिक शिक्षण वैराग येथे झाले होते.
Gorakh Chavan from Solapur died in Uttarakhand
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
लहानपणापासूनच त्यांना भारतीय सैन्यदल याबद्दलची आत्मीयता आणि आवड होती. त्यातूनच त्यांनी आपल्या मित्राबरोबर सैन्य भर्तीसाठी प्रयत्न सुरु केले. जुलै 2009 मध्ये गोरख चव्हाण हे जनरल रिझर्व इंजिनिअरिंग फोर्स ( बी. आर.ओ.) मध्ये चालक म्हणून हिमाचल प्रदेश मधील मनाली येथे रुजू झाले होते. मिझोराम, कुपवाडा, लेह, उत्तराखंड आदी भागात त्यांनी कर्तव्य बजावले आहे.
मंगळवारी संध्याकाळी पितरागड येथे कर्तव्य बजावत असताना वाहन दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी होऊन त्यांना वीरमरण आले. त्यांनी बारा वर्ष सैन्यदलामध्ये सेवा बजावली आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. नुकतेच नवीन घराचे बांधकाम पूर्ण झाले असून मे महिन्यात सुट्टीवर आल्यावर गृहप्रवेश करणार होते. पण त्यापूर्वीच काळाने घाला घातला व त्यांचे गृहप्रवेशाचे स्वप्न अधुरे राहिले.
बुधवारी दुपारी चव्हाण यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी रातंजन येथे आणण्यात येणार आहे, अशी माहिती मिळाली असून संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे.