सोलापूर : शेतक-यांची बँक म्हणून ओळख असलेल्या सोलापूर डीसीसी बँक बुडवणा-या बेजबाबदार संचालकांची अब्रु उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर कार्यक्रमात काढली. तेही शेतकरी मेळाव्यात. संचालकांनी कर्जे घेतली, घेतलेली कर्जे थकवली, त्यामुळेच बँक डबघाईस आल्याचे अजित पवारांनी बोलून दाखवली. Solapur: Ajit Pawar slandered the director in a public event
शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाणारी इथली डीसीसी बँक अडचणीत आली. त्यात शेतकऱ्यांची काहीच चूक नाही. बँक अडचणीत येण्यास संचालक मंडळ जबाबदार आहे. सभासदांनी तुम्हाला बँकेत विश्वस्त म्हणून पाठविले होते; मालक म्हणून नाही. तुम्हाला आम्ही मदत निश्चित करू. पण विश्वासाने तुमच्या ताब्यात दिलेल्या संस्था तुम्हीच चांगल्या पध्दतीने चालवल्या पाहिजेत. त्या चालवण्यासाठी मी आणि शरद पवारांनी इथे यायचे का? असा खडा सवाल उपस्थित करत सोलापूरची डीसीसी बँक अडचणीत आणणाऱ्या संचालक मंडळांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर कार्यक्रमात आपला राग व्यक्त केला.
एकेकाळी शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची लागलेली वाट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आजही सलत असल्याचे शनिवारी प्रकर्षाने जाणवले. सोलापूर जिल्हा बँकेत तुम्हाला विश्वस्त म्हणून पाठविले होते मालक म्हणून नाही. त्या त्या भागातील नेतेमंडळींनी बँका आणि कारखाने चांगल्या चालवावेत ना? ते चालविण्यासाठी मी आणि शरद पवारांनी यायचं का? हा सवाल म्हणजे अजितदादांच्या मनात राहिलेली सल असल्याचे जाणवले. अनगर (ता. मोहोळ) येथे शनिवारी (ता. 30) झालेल्या शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री पवारांनी माजी संचालकांना हे खडे बोल सुनावले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ म्हणून महाराष्ट्रात ठोकून बोलतो
तुमच्या सहकारी संस्था या तुम्हीच चांगल्या पद्धतीने चालविल्या पाहिजेत. मी माझ्या ताब्यातील संस्था चांगल्या पद्धतीने चालवितो; म्हणून महाराष्ट्रात गडचिरोली असो की मोहोळ, कुठेही ठोकून बोलतो, जे आम्हाला जमते ते तुम्हाला का नाही? असा प्रश्न उपस्थित करत अजितदादांनी इथल्या संचालक मंडळाची निष्क्रियताच सांगून टाकली.
□ खरं बोललो तर लई बोलतो म्हणतात
सोलापूरची डीसीसी बँक कुणी अडचणीत आणली? ती कुणामुळे अडचणीत आली? मी बोललो की म्हणतात की लई बोलतो. पण खरं आहे, तेच बोलतो ना? बँक अडचणीत येण्यास संचालक मंडळ जबाबदार आहे. सभासदांनी तुम्हाला बँकेत विश्वस्त म्हणून पाठविले होते; तिथे तुम्ही मालक म्हणून बसलात. म्हणून हे घडले. असे खडे बोल अजित पवार यांनी बँकेच्या माजी संचालकांना जाहीर सभेत सुनावले.
□ कर्ज घेतली अन् थकवली, म्हणून बँक बुडाली
विधिमंडळ अधिवेशनात सोलापूर डीसीसीचा प्रश्न विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला होता. त्यावेळीही उपमुख्यमंत्री पवार यांनी अशीच रोखठोक भूमिका घेतली होती. सोलापूर जिल्हा बँकेच्या संचालकांनी व संचालकांच्या समर्थकांनी भरमसाठ कर्जे घेतली. घेतलेली कर्जे थकविली. त्यातूनच बँक डबघाईला आली. त्यामुळे २०१८ पासून या बँकेवर प्रशासक कार्यरत आहे, असे अजितदादांनी स्पष्ट सांगून टाकले.
□ राजन पाटलांना संधी मिळेल
राजन पाटील यांच्याविषयी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, आरक्षणामुळे विधानसभेवर संधी देता आली नाही म्हणून मी पुढील आठवड्यात खा. शरद पवार यांच्याशी बोलणार आहे. राजन मालकांना आणखी काही वेगळी संधी देता येते का याचा प्रयत्न करणार आहे असे उपमुख्यमंत्र्यांनी म्हणतानाच उपस्थित जनसमुदायाने टाळ्यांचा कडकडाट केला.