सोलापूर : शहरातील पार्क स्टेडियम क्रिकेटसाठी लवकरच खुले होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. आयुक्तांनी क्रिकेट सामन्यासाठी असणारे पूर्वीचे दर कमी करून खेळाडूंना दिलासा दिला आहे. लवकरच पालकमंत्र्यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. Park Stadium to open soon; Park Chowpatty to be removed: Commissioner’s information
पार्क स्टेडियम कमिटीची बैठक बुधवारी (ता. 4) सायंकाळी महापालिका आयुक्त कार्यालयात पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पार्क स्टेडियमचे दुरुस्ती व सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. पार्क स्टेडियम चे काम पूर्ण झाले आहे. स्टेडियम महापालिकेकडे हस्तांतरण करण्यात आले आहे. लवकरच या स्टेडियमचे उद्घाटन पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर हे मैदान सर्वांसाठी खुले करण्यात येणार आहे.
दरम्यान यापूर्वी क्रिकेटसाठी जे भाडे होते ते कमी करण्यात आले आहे. याशिवाय असोसिएशन आणि शाळांमार्फत भरवण्यात येणाऱ्या क्रिकेट स्पर्धांना भाड्यात सूट देण्यात आली आहे. याशिवाय महिलांसाठीच्या स्पर्धेसाठीही विशेष सूट देण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.
□ स्टेडियमचे नवे दर असे, पण क्रिकेट असोसिएशनचा विरोध
स्टेडियमवर क्रिकेट सामने व सराव करण्यासाठी महापालिकेने दर निश्चित केले होते. या दरवाढीस क्रिकेट असोसिएशनने विरोध केला होता. या संदर्भात पुन्हा बैठक घेतली. सोमवार ते शुक्रवार या दरम्यान क्रिकेट सामने भरविण्यासाठी १२ हजारऐवजी नऊ हजार रुपये. शनिवार ते रविवारी असे दोन १५ हजार ऐवजी १३ हजार असोसिएशनच्या सामन्यांसाठी १० टक्के सवलत. महिलांसाठी २० टक्के सवलत मिळेल. सरावासाठी महिन्याला १५ हजार रुपये भरावेच लागतील. यात कपात होणार नाही. पार्क स्टेडियमचे नवे स्वरूप पाहूनच हा निर्णय घेतल्याचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले, हे दर निश्चित करताना क्रिकेट असोसिएशनला बोलावले नाही. हे दर मान्य नाहीत, असे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेम्बर्सु यांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ पार्क चौपाटी हटवणार; स्ट्रीट बाजार येथे पर्यायी व्यवस्था
सोलापूर : पार्क स्टेडियम लवकरच सुरू होणार असल्याने पार्किंगची व्यवस्था चौपाटी येथे करण्यात येणार आहे. त्यासाठी ही चौपाटी हटवण्याचा निर्णय आयुक्त पी. शिवशंकर यांनी घेतला आहे. चौपाटीवरील विक्रेत्यांना स्ट्रीट बझार समोरील रस्त्याचा पर्याय आयुक्तांनी ठेवला आहे.
शहरातील पार्क स्टेडियमच्या लगत चौपाटी आहे. येथे जवळपास शेकडो व्रिकेते आहे. येथे रोज सायंकाळी सोलापूरकरांची मोठी गर्दी होते. त्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होते. महापालिकेने अनेकदा येथील विक्रेत्यांवर कारवाईही केली होती. मात्र दोन-चार दिवसांनी पुन्हा विक्रेते आपला व्यवसाय सुरू करत होते. मात्र आता ही चौपाटी पूर्णपणे हटवण्यात येणार आहे.
पार्क स्टेडियम क्रिकेटसाठी लवकरच खुले होणार आहे. येथे मोठ्या सामने आयोजित करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी पार्किंगची व्यवस्था चौपाटीच्या जागेवर होणार आहे. त्यामुळे आयुक्तांनी चौपाटीवरील विक्रेत्यांना नोटिसा बजावल्या असून त्यांना स्ट्रीट बाजार येथे पर्यायी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान येथील विक्रेत्यांनी सोमवारपर्यंत मुदत मागितली आहे, असेही आयुक्त यांनी सांगितले. – विक्रेत्यांचा निर्णय न आल्यास पुढील आठवड्यात तेथील चौपाटी असल्याचे आयुक्त हटवणार असल्याचे शिवशंकर यांनी सांगितले.