Today Blogs: Importance of teachers in life, but big problem facing teachers….
समाजात अनेकांना वाटते की आजच्या – पिढीमध्ये शिक्षकांचे महत्त्व राहिले नाही. कारण शिक्षक जे काही सांगू शकतो, ती माहिती इंटरनेटवर उपलब्ध असते. परंतु शिक्षकाची माणूस, समाज, राष्ट्र आणि संपूर्ण जग घडवण्यात महत्त्वाची भूमिका असते. शिक्षकाचे काम मुख्यत्वे विद्यार्थ्याला माणूस म्हणून प्रेरित करणे आणि वाढवणे हे असते. शिक्षक हे फक्त टेप रेकॉर्डर नाहीत, जे काहीतरी वाचतात आणि काही माहिती तुमच्यापर्यंत पोहचवतात. शिक्षक म्हणजे एक अशी व्यक्ती आहे, जी विद्यार्थ्याला विशिष्ट मार्गाने प्रेरित करून त्यांचे जीवन घडवत असते.
मुख्यत्वे अनेक मुलांना, कोणता शिक्षक एखादा विषय शिकवत आहे हे ठरवतो की त्यांना तो विषय आवडतो की नाही. विद्यार्थ्याची शिक्षकांशी ओळख झाली, शिक्षक पुरेसा प्रेरणादायी असेल तर तो विषय मुलांसाठी मनोरंजक बनतो. मुलांची क्षमता वाढवण्याच्या आणि एखाद्या विशिष्ट विषयात मुलाची आवड निर्माण करण्याच्या प्रक्रियेत शिक्षक नक्कीच मोठी भूमिका बजावतात.
विद्यार्जन करणारे विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे संबंध जिव्हाळ्याचे असायला हवेत. तसेच मजबूत समाज घडविण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचा मिळून भक्कम सेतू बांधण्याची आवश्यकता आहे.
आजच्या माहितीयुगात विद्यार्थी आणि सातत्याने शिक्षक असल्यामुळे शिक्षकांनी आपली कार्यतत्परता वाढवली पाहिजे. शिक्षकांनी ग्रंथालयात जाऊन अत्याधुनिक पुस्तके, मासिके यांचा उपयोग करून आपली ज्ञानलालसा सतत जागृत ठेवली पाहिजे. जो रात्रंदिवस ज्ञान मिळविण्यासाठी धडपडतो आणि विद्यार्थ्यांना ज्ञान देतो, तोच खरा तळमळीने कार्य करणारा शिक्षक असतो आणि तिच त्याची खरी कर्तव्य परायणता असते. आपल्या वाट्याला आलेले कार्य कुशलतेने, आनंदी वृत्तीने, बिनचूकपणे, वेळेत, नियमांच्या अधीन राहून करायला हवे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
आज शिक्षकांना शैक्षणिक कामाव्यतिरिक्त अनेक कामे करावी लागतात. त्यात मतदार याद्या
तयार करणे, जनगणना, पटनोंदणी, हत्तीपाय निर्मूलनासाठी सर्वेक्षण, वृक्षारोपण, शाळेची रंगरंगोटी, विद्यार्थ्यांचे बँक खाते, आधार कार्ड काढून देणे, पालकांची सभा, शाळा व्यवस्थापन समिती सभा, शाळेची ऑनलाईन माहिती भरणे, यू डायसवर माहिती भरणे, शैक्षणिक अहवाल तयार करणे, शिष्यवृत्तीबाबत माहिती भरणे, शिक्षण विभागाने मागितलेली माहिती पुरविणे, शालेय पोषण आहार वाटपाची कामे, पोषण आहारच्या नोंदी ठेवणे, धान्यसाठा नोंदविणे, धान्य, साहित्याची मागणी, शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे, विद्यार्थ्यांना धान्य वितरण करणे, रेशनकार्ड तसेच इतर सर्व्हेक्षण करणे, सतत निवडणुकांची कामे यामुळे शिक्षकांच्या शैक्षणिक कार्यात व्यत्यय येऊन ते यथायोग्य पार पडत नाहीत. तसेच एका वर्गामध्ये मुलांची भरमसाट संख्याही काही शिक्षकांसमोरील मोठी समस्या आहे. त्यामुळेच शाळांची गुणवत्ता घसरली आहे.
प्रत्येक राष्ट्रीय कामात मदत करणे, हे तर काम सध्या शिक्षकांच्या बाबतीत नित्याचेच झाले आहे. शिक्षकांना अवांतर दिलेल्या अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होते आहे. अनेक शिक्षकांना त्यांच्या शिक्षण कार्यात अडथळा बनणारा समाज आणि शासनाशी लढावे लागते. तेव्हा काही शिक्षक समाज आणि शासनाला अनुकूल राहून कार्य करतात.
अन्यथा राजकीय दबावामुळे अनेक शिक्षकांच्या बदल्या लांब ठिकाणच्या त्रासदायक ठिकाणी होतात. अनेक पालकांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळत नाही की, शिक्षकांचे काम किती अवघड आहे. ज्या शाळेमध्ये केवळ एक शिक्षक आहे, त्या शाळेमध्ये तर शिक्षकांचे हाल होत आहेत.
विद्यार्थ्यांना सांभाळण्यापासून ते अशैक्षणिक कामे करताना त्यांच्या नाकीनऊ येत आहे. एखाद्या दिवशी सुट्टी घेतली तरी शाळा बंद ठेवण्याची वेळही शिक्षकांवर येते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये शिक्षकाची अत्यंत महत्वाची भूमिका असते. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जातो. तसेच विद्यार्थी देखील शिक्षकां विषयीच्या आपल्या भावना या दिवशी विविध उपक्रमांच्या माध्यमाद्वारे व्यक्त करतात त्यामुळेच आपल्या शैक्षणिक जीवनात शिक्षकांचे महत्त्व अनन्य साधारण आहे, असे मला वाटते.
– पद्माकर कुलकर्णी, सोलापूर