● ‘मधुमेह हटाव’ ही मोहीम प्रभावीपणे राबविणार
पंढरपूर – पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय हे सध्या 100 खाटांचे आहे. स्थानिक आमदार समाधान अवताडे यांच्या मागणीनुसार 200 खाटांचे सामान्य रुग्णालयात रूपांतर करून लवकरच कॅबिनेटच्या बैठकीत अंतिम मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी पंढरपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 200 bedded general hospital in Pandharpur soon: Health Minister Tanaji Sawant
संपूर्ण देशाला मधुमेह या रोगाने ग्रासले आहे. यामुळे ज्या प्रमाणे पोलिओ हटाव मोहिम राबविण्यात आली, त्याच पध्दतीने महाराष्ट्रात ‘मधुमेह हटाव’ ही मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची घोषणा पंढरपूर येथे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केली.
सोलापूर जिल्ह्याच्या दौर्यावर असणार्या डॉ. तानाजी सावंत यांनी पंढरीत विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रा. शिवाजी सावंत, महावीर देशमुख यांच्यासह शिंदे गटाच्या शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान राज्यातील शासकीय रूग्णालय तसेच खासगी रूग्णालयातील सुविधा, मोठ्या प्रमाणात आकारली जाणारे बिल याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. या सर्वाचा विचार करूनच राज्यातील सर्व शासकीय व खासगी रूग्णालयांची पाहणी करण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून सदर पथक येथे अचानक भेट देवून तपासणी करणार आहे. येत्या आठ दिवसात याचे काम सुरू होईल अशी माहिती मंत्री तानाजी सावंत यांनी दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
केंद्र व राज्य शासनाच्या योजना असतानाही अनेकदा खासगी रूग्णालयात अशा रूग्णांवर मोफत उपचार करण्याबाबत टाळाटाळ केली जाते. तसेच मोफत उपचार असतानाही बिल आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. यासाठी आरोग्य विभागाअंतर्गत अशा रूग्णालयांवर कारवाई करण्याचे आदेश काढले असून येत्या आठ दिवसात याचे परिणाम दिसतील अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्यात सध्या कोरोना, डेंग्यू, स्वाईन फ्लू आदी साथीचे रोग नियंत्रणात असून या रूग्णांची संख्या कमी होत असल्याचा दावा तानाजी सावंत यांनी केला.
पंढरपूर उपजिल्हा रूग्णालय २०० खाटांचे करण्याचा प्रस्ताव मागील सरकारच्या काळात दिला असेल तर येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यास मान्यता देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तर टाटा मेमोरियल पंढरीत रूग्णालय उभे करणार असले तर त्यांना जागा देणार असल्याचेही डॉ.सावंत यांनी सांगितले.
युक्रेन मध्ये युध्द सुरू असल्याने तेथे वैद्यकीय शिक्षण घेणारे अनेक तरूण भारतात वापस आले आहेत. त्यांच्या पुढील शिक्षणाबाबत राज्य सरकार निर्णय घेवू शकत नाही. यासाठी केंद्र सरकारने निर्णय घेतल्यास अशा विद्यार्थ्यांची जबाबदारी घेवू अशी ग्वाही त्यांनी दिली.
शिंदे गटाच्या सेनेची ताकद सोलापूर जिल्ह्यात असून जे आमच्या बरोबर नाहीत त्यांची काय ताकद आहे हे सर्वांनाच माहित आहे असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार का या प्रश्नावर मी एक छोटा कार्यकर्ता असून याबाबत काही माहिती नाही. परंतु आदेश आला की मेळाव्यास जाणार असे उत्तर देत यावर अधिक बोलण्याचे तानाजी सावंत यांनी टाळले.
“मागील सरकारच्या काळात पंढरपूर येथे स्थनिक आणि भाविकांच्या सोयीसाठी 200 खाटांचे सामान्य रुग्णालय करण्याची मागणी मी विधानसभेत केली होती. आता आमचे सरकार आल्यामुळे लवकरच 200 खाटांचे सर्व सोयीयुक्त रुग्णालय करण्यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे”
– समाधान अवताडे, आमदार पंढरपूर मंगळवेढा मतदार संघ