मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतले आहे. यावेळी राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे हे उपस्थित होते. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी ही भेट असू शकते, असे बोलले जात आहे. Raj Thackeray took darshan of Ganaraya at Chief Minister’s residence, discussion mission Vidarbha tour
दरम्यान शिंदे व ठाकरे यांच्यामध्ये 40 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे. ठाकरे व शिंदे यांच्यात मुंबई महानगरपालिकेसाठी युती झाल्याची शक्यता आहे. कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी थेट नाव घेत उद्धव ठाकरेंवर हल्ला केला. आज राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाढलेली राजकीय जवळीक पाहता ही युती शिवसेनेसाठी अडचण ठरणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिंदे गटातील आमदार व भाजपच्या आमदारांसाठी स्नेहभोजन आयोजित केले आहे. त्यांनी राज ठाकरेंना देखील निमंत्रण दिले होते. ठाकरे व शिंदे यांच्यात मुंबई महानगरपालिकेसाठी युती होण्याची शक्यता आहे. या भेटीत त्यावर चर्चा होऊ शकते.
राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वरचेवर होणाऱ्या भेटी या होत आहेत. तसेच मनसे-भाजप युतीचं द्योतक ठरत आहेत. अश्यात युतीचा महत्वपूर्ण भाग असलेले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचीही जवळीक आता वाढताना दिसत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
याआधी मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या शीवतीर्थ या निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते. आज राज ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर जात शिंदेंची भेट घेतली. गणेशोत्सव सुरु आहे. त्यामुळे मुख्यमंत्री निवासस्थानच्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी राज ठाकरे गेले.
याचवेळेस वर्षा बंगल्यावर भाजप आमदार आणि एकनाथ शिंदेंगटाच्या (शिवसेना ) नेते तसंच आमदारांच्या स्नेहभोजनाचा पूर्वनियोजित कार्यक्रम चालू होता. तर हेच अचूक टायमिंग साधत राज ठाकरे वर्षा बंगल्यावर पोहोचल्यामुळे चर्चांना उधाण आलं. पण भाजप-शिवसेनेच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमालाही राज ठाकरे यांनी हजेरी लावली का नाही, याबाबत माहिती मिळू शकली नाही.
□ सहा दिवस ‘मिशन विदर्भ’ दौरा
18 सप्टेंबरपासून राज ठाकरे यांचे मिशन विदर्भ सुरु होत आहे. या दौऱ्याची तयारी सुरु झाली असून, मनसे नेत्यांनी आज नागपूर येथील तयारीचा आढावा घेतला. या दौऱ्यात राज ठाकरे तब्बल सहा दिवस विदर्भात तळ ठोकून असणार आहेत.
या दौऱ्यात राज ठाकरे नागपूर, चंद्रपुर आणि अमरावती येथ मुक्काम करणार आहेत. मनसे संघटनेला बळ देणे, पदाधिकाऱ्यांशी चर्चा, नविन नियुक्त्या आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी, यासाठी राज ठाकरे यांचा सहा दिवस विदर्भ दौरा करणार आहेत.
राज ठाकरे 19 सप्टेंबरला नागपूरला मुक्कामी असून तेथल्या बैठका घेणार आहेत. यानंतर 20 सप्टेंबरला ते चंद्रपूर येथे मुक्काम करणार आहेत. तर 21 आणि 22 सप्टेंबरला अमरावती येथे आढावा बैठका घेणार असल्याची माहिती मनसे नेते राजू उंबरकर यांनी दिली.