पंढरपूर – पंढरपूरसह सहा तालुक्यातून हद्दपार असतानाही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा तालुका उपाध्यक्ष तानाजी शिवाजी शिंदे हा तालुक्यात आढळून आल्यामुळे पोलिसांनी त्यास ताब्यात घेवून गुन्हा दाखल केला आहे. Pandharpur. NCP Vice President Tadipar Tanaji Shinde arrested
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या पथकाने केली. बेकायदेशीर वाळू उपसा व इतर विविध गुन्हे दाखल असल्यामुळे तालुक्यातील आंबे येथील शिंदे टोळीतील अकरा जणांवर मागील आठवड्यात हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती.
तानाजी शिंदे व त्याच्या साथीदारांना पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस, माढा व मोहोळ या तालुक्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार केले आहे. मात्र आज मंगळवारी (ता.13) तानाजी शिंदे हा अनवली चौकात असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथक पाठविले असता शिंदे हा अनवली चौकातील चहाच्या टपरी जवळ आढळून आला.
तानाजी शिंदे याच्याकडे चौकशी केली असता तालुक्यात प्रवेश करण्यासाठी कोणतीही परवानगी नसल्याचे आढळून आले. हद्दपारी आदेशाचा भंग केल्या प्रकरणी तानाजी शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
□ चिठ्ठी लिहून प्रेमीयुगलांनी गळफास घेऊन केली आत्महत्या
सोलापूर : आमचं प्रेम समाजाला मान्य नाही अशी चिठ्ठी लिहून प्रेमीयुगलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ या गावात काल सोमवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली. वाजीद चांद इनामदार (वय २४) व प्रणाली भारत सुतार (वय १७) अशी दोघांची नावे आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
बीबीदारफळ येथील गणेश विद्यालयात मागील वर्षीच इयत्ता १२ वी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या प्रणाली भारत सुतार व विवाहित असलेल्या वाजिद चाँद इनामदार यांनी राहत्या घरात एका दोरीने गळफास घेतला. या घटनेची माहिती आज मंगळवारी सकाळी ७ वाजता सोलापूर तालुका पोलीस ठाण्याला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह खाली उतरविले.
त्यानंतर शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान,आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनीही स्वतंत्र दोन चिठ्ठ्या लिहिल्या आहेत. त्या चिठ्ठ्या पोलिसांच्या हाती लागल्या असून आमचं प्रेम समाजाला मान्य नाही, आमच्या आत्महत्येला कोणासही जबाबदार धरू नये, असा मजकूर चिठ्ठीत लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले.
□ रस्ता ओलांडताना एकाचा मृत्यू ; रिक्षाचालकावर गुन्हा
सोलापूर : रस्ता ओलांडताना रिक्षाने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि.४ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बाळे ब्रिज जवळ घडली.
याप्रकरणी दयानंद बसवराज्य कलशेट्टी (वय-३२,रा. समता नगर,अक्कलकोट) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून रिक्षा क्रमांक एम.एच.१३.सीटी.१०५७ या क्रमांकाच्या चालका विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी व मित्र तसेच फिर्यादीचा भाऊ शिवानंद बसवराज कलशेट्टी (वय-३५) असे तिघे मिळून गुलाब मिस्तरी यांच्याकडे ऑइल चेंज व सर्विसिंग करण्याकरिता दिलेला आयशर ट्रक आणण्यासाठी जात होते. त्यावेळी पायी रस्ता ओलांडत असताना वरील रिक्षा चालकाने निष्काळजीपणाने व भरधाव वेगाने रिक्षा चालवून फिर्यादी यांचा भाऊ शिवानंद याला धडक देऊन त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली.
मयत शिवानंद याला आश्विनी हॉस्पिटल येथे उपचारास दाखल केले असता,तो उपचारादरम्यान मयत झाला आहे. शिवानंद याच्या मृत्यूस कारणीभूत रिक्षाचालक हा ठरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील घटनेचा तपास पोसई भोईटे हे करीत आहेत.