The horse of Baramatikars in the province of Shindeshahi family on ‘BJP’s track’
■ माढा – कुर्डुवाडीत चर्चांना अशरक्ष: उधाण
■ ‘कमळ’ हाती घेण्याला सज्ज असलेल्या माढेकरांवर शरद पवार काय टाकणार गुगली ?
■ भाजपाच्या उंबरठ्यावरील शिंदेशाही शेतकरी मेळाव्यात बारामतीकर काका कशाची करणार पेरणी ?
■ कुर्डुवाडी – माढा व्हाया नागपूर ते राजधानी दिल्लीत काय जाणार मेसेज ?
सोलापूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि गॉडफादर बारामतीकर शरद पवार हे निमगावकर शिंदेशाहीच्या कुर्डुवाडी – माढा साम्राज्यात स्व. विठ्ठलराव शिंदे पुतळा अनावरण आणि शेतकरी मेळाव्यासाठी येत्या सोमवारी दि. १९ तारखेला येत आहेत. दरम्यान राष्ट्रवादीची फारकत घेऊन भाजपचे ‘कमळ’ हाती घेत माढा व्हाया नागपूर ते दिल्ली असा ट्रॅक ठेवण्यासाठी सज्ज असलेल्या माढ्याच्या शिंदेशाहीच्या कार्यक्रमात बारामतीकरांचा अश्व उधळणार असल्याने मुख्य राष्ट्रवादीसह भाजप आणि अन्य पक्षांचेही डोळे विस्फारले आहेत.
शिंदेशाहीचा कुर्डुवाडीतील पुतळा अनावरण सोहळा आणि शेतकरी मेळावा अन् त्याला शरद पवारांची उपस्थिती, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, मुख्यत्वे कुर्डुवाडी माढ्यासह जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. खास करून बाब म्हणजे, माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे तसेच त्यांचे सुपुत्र जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी पिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ‘कमळ’ हाती घेत ते माढा कुर्डुवाडीच्या आपल्या साम्राज्यात फुलविण्याचे पक्के केले, असे मानले जाते.
तथापि, या संदर्भातील सारी खबर बारामतीच्या गोविंद बागेत अन् मुंबईतील ‘सिल्वर ओक’ मध्येही पोहचल्या. आमदार बबनराव शिंदे आणि सुपुत्र रणजितसिंह शिंदे या पुत्राचा ‘भाजपातील बारशा’चा कार्यक्रम केवळ औपचारिकरित्या पूर्ण होण्याचे शिल्लक असण्याच्या वळणावर बारामतीकर काकांची रपेट माढा -कुर्डुवाडी होत असल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे. यातून सर्वच पक्षातील सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
याच वळणावर राष्ट्रवादीचे भीष्म शरद पवार या कार्यक्रमात येऊन माढेकर शिंदेशाहीवर कोणती गुगली टाकणार? शिंदेशाहीने आयोजित केलेल्या सोहळ्यात विशेषतः शेतकरी मेळाव्यात जाणता राजा चाणाक्षपणे तसेच भविष्यातील शिंदेशाहीच्या राजकारणातील नांदी ओळखून कोणती साखर पेरणी करणार? याकडे जिल्ह्यातील राजकीय विश्लेषकांसह मुख्य राष्ट्रवादी भाजप, शिवसेना, काँग्रेस या सर्वच प्रमुख पक्षांसह शिंदेशाही समर्थकांचे लक्ष लागून राहिले आहे.
विशेष करून शिंदेशाही पिता पुत्रांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असतानाही, राष्ट्रवादीच्या शरद पवारांना आपल्या प्रांतात आणून कार्यक्रम घेण्याचे जे धोरण आहे, त्याबाबत कुर्डुवाडी माढा प्रांतातून
नागपूर व्हाया दिल्लीपर्यंत काय मेसेज जाणार ? नागपूरकर भाजपवाले देवेंद्र फडणवीस तसेच दिल्लीस्थित भाजपचे वरिष्ठ नेते या संदर्भात कोणता स्टँड घेणार ? याचीही जोरकस चर्चा जिल्ह्याच्या जाणकारांमध्ये आता रंगू लागली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● चर्चा सिनेकाठी बांधाबाधांवर, घराघरात अन् मनामनातसुध्दा!
कधी काळी उजाड माळरान अशी ओळख असलेल्या माढा तालुक्यात हरित क्रांतीची पहाट आणलेल्या आमदार बबनराव शिंदे आणि त्यांच्या सुपुत्रांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचे मानले जात आहे, असे असतानाच, राष्ट्रवादीच्या शरद पवारांना आणून आपले नेते कार्यक्रम कसा काय घेत आहेत ? भाजपमध्ये जाण्याचा त्यांनी निर्णय बदलला आहे का? या आणि अशा चर्चांचे पेव माढा तालुक्यात सीना नदीकाठी शेताच्या बांधा बांधावर तसेच त्यांच्या समर्थकांमध्ये घराघरात मनामनात फुटले आहेत.
● बोले तो… मामा बिनधास्त !
आ. बबनराव शिंदे आणि त्यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांच्या भाजप प्रवेशाची गोष्ट जगजाहीर झाली. त्या दरम्यान आमदार संजयमामा शिंदे यांनी आपण बारामतीकर प्रेमी आहोत, त्यांच्यावर आपली निष्ठा आहे, शिवाय राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला आपला पाठिंबा आहे, असे जाहीर केले होते. त्यामुळे कुर्डुवाडीच्या कार्यक्रमाला शरद पवार येणे हे त्यांच्यासाठी वेगळे असे काही नाहीच, उलट विशेष आहे, त्यामुळे संजयमामा शिंदे बिनधास्त आहेत, अशी चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये आहे.
● कार्यक्रम पत्रिका पोहोचली फडणवीस यांच्या हातात !
शरद पवार आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत कुर्डुवाडीत होणाऱ्या शिंदेशाहीच्या कार्यक्रमाची पत्रिका ही शिंदेशाही विरोधकांनी भाजपचे नेते आणि फडणवीस यांच्या हातात पद्धतशीरित्या पोहोचवून, जो काही निरोप द्यायचा होता, तो दिला आहे. त्याची पुसटशी चर्चा माढ्यात आहे.
● शिंदेशाही समर्थकांमध्ये उठली चुरचुर
आपले नेते बबनदादा आणि रणजितसिंहभैय्या यांनी भाजप प्रवेश निश्चित केला आहे, असे मानले जात असतानाच, त्यांनी शरद पवारांना आणून कार्यक्रम घेण्याचे ठरविले आहे, त्यामुळे आपल्या नेते मंडळींनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय रद्द केला आहे की काय? ते आपल्या राष्ट्रवादीतच राहणार आहे की काय ? या संदर्भात त्यांच्या खास समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे अन् तशी चुरचुर उठली आहे.