मुंबई : सध्या राज्यात वेदांता प्रकल्पावरुन बरेच राजकारण सुरु आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातला मागे टाकू, असे विधान केले आहे. महाराष्ट्राने 2019 साली 26 अब्ज डॉलरची गुंतवणूक खेचून आणत देशात सर्व राज्यांना मागे टाकले होते. मात्र गेल्या दोन वर्षांतील कारभारामुळे आपण माघारले आहोत. आता पुढील दोन वर्षांत महाराष्ट्र गुजरातला मागे टाकेल, असे ते म्हणाले आहेत. We will overtake Gujarat in the next two years, says Deputy Chief Minister Devendra Fadnavis
ते शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलत होते. सध्या वेदांता- फॉक्सकॉन प्रकल्पावरून राज्य सरकारवर टीका होत आहे. मात्र, यापूर्वीच राज्यात प्रस्तावित असलेला रिफायनरीचा प्रकल्प आणि वाढवण बंदराचा प्रकल्प आकाराला आला असता तर एव्हाना महाराष्ट्र औद्योगिक विकासात इतर राज्यांपेक्षा १० वर्षे पुढे जाऊन पोहोचला असता. आता आम्ही हे दोन्ही प्रकल्प आणणारच आहोत. त्यामुळे आताच्या घडीला महाराष्ट्र गुंतवणूकदार आणि उद्योजकांना आकर्षित करण्यात गुजरातपेक्षा पिछाडीवर असला तरी येत्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेऊन दाखवतो की नाही बघाच, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
यावेळी फडणवीस यांनी महाराष्ट्रात नाणार प्रकल्पाच्यानिमित्ताने देशाच्या वेदांता- फॉक्सवॅगन प्रकरणावरून राज्य सरकारवर सुरु असलेल्या टीकेच्या अनुषंगाने भाष्य केले.
इतिहासातील सर्वात मोठी म्हणजे साडेतीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती. या गुंतवणुकीमुळे आपण पाच लाख लोकांना रोजगार देऊ शकलो असतो. गुजरातच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला तर त्यामध्ये दोन गोष्टींचा प्रमुख वाटा आहे, एक म्हणजे जामनगर रिफायनरी आणि दुसरे म्हणजे मुंद्रा बंदर होय.
नाणार रिफायनरी झाली असती तर महाराष्ट्रात गुजरातपेक्षा तीन ते चारपट मोठा प्रकल्प उभा राहिला असता. त्यामुळे महाराष्ट्र थेट १० वर्षे पुढे गेला असता. आपण हा तेलशुद्धीकरण प्रकल्प आतादेखील करणार आहोत. मात्र, तीन ते चार वर्षांच्या विलंबामुळे आता पूर्वीइतकी आर्थिक गुंतवणूक होणार नाही. शेवटी गुंतवणूकदारही राज्यातील वातावरण कसे आहे, ते पाहत असतात.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
पायाभूत क्षेत्रात सर्वाधिक रोजगारांची निर्मिती होते. पण महाराष्ट्रात बुलेट ट्रेन बंद झाली, मेट्रो प्रकल्प बंद झाला. शेवटी गुंतवणूकदार आणि उद्योजक या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतात, असे फडणवीस यांनी म्हटले.
फडणवीस यांनी आपल्या भाषणात वाढवण बंदराचा मुद्दा उपस्थित केला. डहाणूनजीक वाढवण बंदर उभे राहिले असते तर त्याचा आकार गुजरातच्या मुंद्रा बंदरापेक्षा मोठा असता. वाढवणचे बंदर नैसर्गिक रचनेमुळेच सगळ्यात डीप ड्राफ्ट असणारे बंदर आहे. त्यामुळे जगातील कोणतेही जहाज त्याठिकाणी येऊ शकते. सध्या राज्यात असणारे जेएनपीटी बंदरावर देशातील ७६ टक्के कंटेनर वाहतुकीचा भार पडत आहे. साहजिकच हे बंदर अपुरे पडत आहे, कंटेनर अनेक दिवस अडून राहतात. त्यामुळे वाढवण परिसरात बंदर तयार झाल्यास हा ताण कमी होईल. यामुळे डहाणूतील पर्यावरण किंवा मच्छीमारांना कुठलाही फटका बसणार नाही.
राज्यात रिफायनरी आणि वाढवण बंदराचा प्रकल्प झाला तर पुढील १० वर्षे कोणतेही राज्य महाराष्ट्राच्या आसपासही पोहोचू शकत नाही. पण ज्यांनी आजवर काही केले नाही, ते आम्हाला शहाणपण शिकवत आहेत. आगामी काळात राज्य सरकार महाराष्ट्रातील इज ऑफ डुईंग बिझनेस वाढवण्यावर भर देईल, असेही फडणवीस यांनी म्हटले.
□ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नांदेड, हैदराबादमध्ये
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यानंतर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे शासकीय ध्वजारोहण, पुष्पचक्र अर्पण करून लगेच ते हैदराबादकडे रवाना झाले. हैदराबादेतील मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे शासकीय ध्वजारोहन संपन्न झाला.