सोलापूर : सोलापूर शहरात गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा हळूहळू वाढत आहे. महापालिकेच्या आज रविवारच्या अहवालानुसार शनिवारी ७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. आता सक्रिय रुग्णांची एकूण संख्या देखील अर्धशतक पार झाली असून ती 52 वर पोहोचली आहे. Half a century of active corona patients in Solapur city
दरम्यान, सोलापूर शहरातील रुग्ण संख्या वाढत असल्याने महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग पुन्हा एकदा उपाययोजनासाठी कामाला लागले आहे. शहरात आत्तापर्यंत ६ लाख १९ हजार ६४४ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ३४ हजार ४१४ जण बाधित आढळून आले आहेत. तर यामधील १ हजार ५१२ रुग्णांचा बळी गेला आहे.
सोलापूर शहर कोरोनामुक्त होऊन सक्रिय रुग्णांची संख्या शून्यावर आल्याचे समाधान व्यक्त होत असतानाच पुन्हा गेल्या दोन महिन्यात मोठी नसली तरी हळूहळू वाढली आहे. रविवारच्या अहवालानुसार शनिवारी दिवसभरात २४१ जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या होत्या. यामध्ये २ पुरुष आणि ५ महिला असे ७ जण बाधित आढळून आले . तर रुग्णालयात उपचार घेत असलेला एक जण कोरोनामुक्त होऊन घरी परतला आहे.
आता शहरातील ५२ सक्रिय रुग्णापैकी विविध रुग्णालयात १४ तर ३८ जणांवर घरात विलगीकरण करून उपचार करण्यात येत आहेत. यामध्ये २५ पुरुष तर २७ स्त्री रुग्ण आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》सोलापूर जिल्ह्यात लम्पीबाधित सात जनावरांचा मृत्यू, माळशिरस संवेदनशील
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात लम्पी या संसर्गजन्य आजाराने बाधित असलेल्या सात जनावरांचा मृत्यू झाला असून सध्या १११ बाधित जनावरांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पशुपालकांत चिंतेचे वातावरण आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
मृत सात जनावरांमध्ये चार बैल तर तीन गायींचा समावेश आहे. यामध्ये सांगोला तालुक्यातील महूद (एक) शिवणी (एक), उत्तर तालुक्यातील कवठे (एक), देगाव (एक), माढा तालुक्यातील ढवळस (एक), माळशिरस तालुक्यातील तिरखंडी (एक), पंढरपूर तालुक्यातील कानापुरी (एक) अशा सात मृत जनावरांचा समावेश आहे.
माळशिरस तालुक्यात या आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. येथे ५६ जनावरांना लम्पी झाला असून उपचार सुरू आहेत. सांगोला (११), माढा (आठ), बार्शी (एक), पंढरपूर (पाच), उत्तर सोलापूर (२९) जनावरांचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात ८७ हजार जनावरांचे लसीकरण झाले आहे. तर दोन लाख २६ हजार लस पशुसंवर्धन विभागाकडे उपलब्ध आहे.
सोलापूर जिल्ह्यात लम्पी या आजाराचा संसर्ग जनावरांमध्ये वाढत असल्याने लस, औषधे तसेच इतर साहित्य खरेदी करण्यासाठी म्हणून शासनाने जिल्हा नियोजनातून एक कोटी रुपये निधी रक्कम मंजूर केला आहे. तर जि.परिषदेच्या सेसमधूनही ७६ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.