□ पदवीधरच्या 9 जागांसाठी सर्वाधिक 8 हजार 674 मतदार
सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट), विद्यापरिषद, आणि अभ्यासमंडळाच्या विविध 38 जागांसाठी 75 उमेदवार रिंगणात उतरले असून यासाठी गुरुवारी (दि. 29) सकाळी 9 ते दुपारी 4 यावेळेत शहर व जिल्ह्यातील एकूण 16 केंद्रांवर मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव योगिनी घारे यांनी दिली. Voting for Solapur University Authority Boards on Thursday; 75 candidates for 38 seats!
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सभा व निवडणूक विभागाच्यावतीने अधिकार मंडळांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. सिनेटच्या पदवीधर मधून 10 पैकी अनुसूचित जातीची एक जागा बिनविरोध झाली आहे. उर्वरित नऊ जागांसाठी निवडणूक लागली आहे. खुला प्रवर्गातून 5 जागांसाठी 20 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. अनुसूचित जमातीच्या एका जागेसाठी दोन उमेदवार, डीटीएनटी प्रवर्गाच्या एक जागेसाठी तीन उमेदवार, ओबीसीच्या एक जागेसाठी दोन उमेदवार तर महिला प्रवर्गाच्या एक जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत.
पदवीधरच्या सर्व प्रवर्गाच्या जागांसाठी एकूण 8 हजार 674 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. महाविद्यालय शिक्षकांच्या 10 पैकी अनुसूचित जमाती प्रवर्गाची एक जागा बिनविरोध झाली आहे. उर्वरित नऊ जागांसाठी निवडणूक लागली आहे. खुला प्रवर्ग शिक्षकांच्या पाच जागेसाठी 10 उमेदवार, अनुसूचित जातीच्या एका जागेसाठी दोन उमेदवार, डीटीएनटीच्या एक जागेसाठी तीन उमेदवार, ओबीसीच्या एक जागेसाठी दोन उमेदवार तर महिला प्रवर्गाच्या एक जागेसाठी दोन उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. महाविद्यालय शिक्षकांसाठी एकूण 957 मतदार आहेत.
विद्यापीठ शिक्षकांच्या तीन जागांपैकी महिला प्रवर्गाची जागा बिनविरोध झाली आहे. खुला प्रवर्गाच्या एका जागेसाठी दोन उमेदवार तर अनुसूचित जमातीच्या एका जागेसाठी दोन उमेदवार येथे निवडणूक लढवीत आहेत. विद्यापीठ शिक्षकांसाठी एकूण 22 मतदार आहेत. संस्था प्रतिनिधीच्या सहा जागांपैकी अनुसूचित जमाती आणि महिला प्रवर्गाची जागा बिनविरोध झाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
खुला प्रवर्गाच्या चार जागांसाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत. संस्था प्रतिनिधींसाठी एकूण 55 मतदार आहेत. विद्यापरिषदेच्या आठ जागांपैकी सात जागा बिनविरोध झाल्या आहेत. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या खुल्या प्रवर्गाच्या एका जागेसाठी तीन उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. अभ्यासमंडळाच्या रसायनशास्त्राच्या तीन जागेसाठी चार उमेदवार, प्राणिशास्त्राच्या तीन जागांसाठी चार उमेदवार, इंग्रजीच्या तीन जागेसाठी चार उमेदवार, शैक्षणिक मूल्यमापनच्या तीन जागांसाठी चार उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून निवडणुकीचे चोख नियोजन करण्यात येत आहे. एकूण 88 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. केंद्र अध्यक्ष, मतदान अधिकारी आणि सेवकांची नियुक्ती करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
□ मतदान करताना अशी घ्या काळजी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिकार मंडळांसाठी पसंतीक्रमानुसार मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. सिनेटच्या पदवीधर मतदारांसाठी पांढऱ्या रंगाची मतपत्रिका असणार आहे. महाविद्यालय शिक्षकांसाठी गुलाबी रंगाची, विद्यापीठ शिक्षकांसाठी पांढऱ्या रंगाची मतपत्रिका आणि संस्थाप्रतिनिधीसाठी हिरवा, विद्यापरिषदेसाठी पिवळा आणि अभ्यास मंडळासाठी आकाशी निळा रंगाची मतपत्रिका असणार आहे.
मतपत्रिकेवर मतदान करताना निळ्या शाईच्या पेनचा वापर करावा लागणार आहे. मराठी अथवा इंग्रजी अंकाचाच पसंतीक्रम लिहावा लागणार आहे. पसंतीक्रम फक्त अंकातून लिहावयाचे आहे. अक्षरातून लिहिल्यास मतपत्रिका बाद ठरेल. मतपत्रिकेवर 1 अंकापासून पसंतीक्रम लिहिणे बंधनकारक असेल. त्याप्रमाणे पुढे पसंतीक्रम देता येईल. मतपत्रिकेवर खाडाखोड अथवा कोणतेही अधिकचे चिन्ह लिहिल्यास मत बाद करण्यात येईल.