□ कवठ्याच्या भाभीचा थांगपत्ता लागेना: सौंदरेच्या टीचर सापडल्या तरी कारण कळेना
सोलापूर : सोलापूर शहरानजीक असणाऱ्या कवठे (ता. उत्तर सोलापूर) गावच्या सरपंचभाभी अचानक गावातून बेपत्ता झाल्या. नातेवाईक, गावकरी आणि पोलीस आकाशपाताळ एक करून शोध घेत असले तरी त्यांचा थांगपत्ता लागेना. ही घटना ताजी असतानाच सौंदरे (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील महिला सरपंचही अचानक गावातून गायब झाल्या. त्यांना ग्रामीण पोलिसांनी शोधून काढले असले तरी त्यांच्या गायब होण्याचे कारण मात्र पोलिसांनाही सापडेना. Two women sarpanchs missing from Solapur district; Sarpanchbhabhi took notice of the Women’s Commission
कोण म्हणतेय गावकऱ्यांच्या त्रासाला कंटाळून गेल्या, कोण म्हणतेय राजकारणाला वैतागून गेल्या. पोलिसांचा तपास प्राथमिक अवस्थेत असल्यामुळे कोणाचेच कोणाला कळेनासे झाले आहे.
गेल्या वीस दिवसांपूर्वी कवठे (ता. उत्तर सोलापूर) गावच्या सरपंचभाभी अचानक गावातून गायब झाल्या. त्यांचे नातेवाईक, गावकरी, सोलापूर शहर पोलीस रात्रंदिवस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र त्यांचा पत्ता लागला नाही. ही घटना ताजी असतानाच सौंदरे गावच्या सरपंच शुक्रवारी अचानक गायब झाल्या.
पेशाने शिक्षक असणाऱ्या सरपंचबाई अचानक गावातून गायब झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह गावही हादरले. खबर मिळताच पोलीस यंत्रणाही हादरली. मात्र त्यानंतर अवघ्या ४८ तासात त्यांचा शोध लागला आणि पोलिसांनी त्यांना रत्नागिरीतून ताब्यात घेऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.
शाळेतून घरी परत आल्याच नाहीत सौंदरेच्या महिला सरपंच ह्या बार्शी शहरातील एका शाळेत शिक्षिका आहेत. नेहमीप्रमाणे त्या शुक्रवारी सकाळी शाळेला गेल्या. मात्र शाळा सुटल्यानंतर त्या घरी परतल्याच नाहीत. त्यामुळे सायंकाळी त्यांच्या कुटुंबीयांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ सोशल मीडियामुळे रत्नागिरीत लागली खबर
सरपंचबाईंचा फोटो आणि माहिती राज्यातील सर्वच पोलीस ठाण्यांना कळवली. शिवाय ही बाब सोशल मीडियावरही व्हायरल झाली. सोशल मीडियावरील पोस्ट रत्नागिरी जिल्ह्यापर्यंत पोहचली. त्यामुळेच सरपंचबाई ह्या रत्नागिरीतील एका मठात असल्याची खबर दापोली पोलिसांमार्फत सोलापूर ग्रामीण पोलिसांपर्यंत पोहचली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ हालचाल करून सरपंचबाईंना ताब्यात घेऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.
□ महिला आयोगाने घेतली दखल
दरम्यान, सौंदरेच्या सरपंचबाई गायब असल्याची माहिती राज्य महिला आयोगापर्यंत पोहचली होती. आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी ट्विट करून सरपंचबाईंना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यामुळे पोलीस यंत्रणेने वेगवान हालचाली केल्या. दापोली पोलिसांचीही सतर्कता कामाला आली आणि सरपंचबाईंचा शोध लागला.
□ कारण कळेना…
दापोली पोलिसांकडून खबर मिळताच बार्शी शहर पोलिसांनी रत्नागिरी जिल्ह्यातील एका आश्रमातून सरपंचबाईंना ताब्यात घेऊन त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे. अद्याप सरपंचबाईंकडे कसलीही चौकशी केलेली नाही. त्यांचा प्राथमिक जबाबही अद्याप नोंदवण्यात आलेला नाही. येत्या एक दोन दिवसांत त्यांचा जबाब नोंदवला जाईल. त्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा होईल, असे बार्शी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अण्णाराव मांजरे यांनी सांगितले.