□ चौघांनी चाकूने केले सपासप वार, विवाहित तरुण जागेवर ठार
सोलापूर : तुमच्या शिकवणीमुळे आमच्या बायका पंचायतीमध्ये घटस्फोट देऊन सोडून गेल्या. या कारणावरून घरात घुसून चाकू आणि लाथाबुक्क्याने मारून एका २५ वर्षीय विवाहित तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. Solapur: A married youth was killed after his neighbor set himself on fire on suspicion of teaching his wives
ही घटना तळेहिप्परगा (ता. उत्तर सोलापूर) येथील शिकलगार वस्तीत सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणात जोडभावी पेठच्या पोलिसांनी मयताच्या घराशेजारी राहणाऱ्या एकाच कुटुंबातील सख्खे भाऊ आणि त्यांचे आईवडील अशा चौघांविरुद्ध खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले आहेत.
रवीसिंग सिसपालसिंग टाक (वय 25 रा. तळेहिप्परगा, फुटरस्ता, शिकलगार वस्ती) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याची पत्नी सिमरन टाक (वय २०) ही देखील मारहाणीत जखमी झाली असून तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणात पोलिसांनी मयताच्या घरा शेजारी राहणारे विजयसिंग दीपकसिंग रबानी, त्याचा भाऊ अजयसिंग, वडील दीपकसिंग आणि आई चांदनीकौर रबानी अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून ते सध्या फरार आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
तळे हिप्परगा येथील रस्त्या लगत शिकलगार वस्ती असून त्या ठिकाणी रवीसिंग टाक हा आपल्या कुंटूंबिया सोबत राहण्यास होता. तो रांगोळी तयार करून विक्री करण्याचा व्यवसाय करीत होता. त्याच्या घराशेजारीच त्यांच्या शिकलगार समाजातील विजयसिंह रबानी आणि त्याचे कुटुंबीय राहण्यास आहेत.
काही दिवसापूर्वी विजयसिंग आणि त्याचा भाऊ अजयसिंग यांच्या बायका घर सोडून माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे दोघे रवीसिंग टाक यांच्या कुटुंबीयांवर चिडून होते. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास विजयसिंग रबानी याच्यासोबत चौघेजण त्याच्या घरात घुसले आणि तुमच्या शिकवणीमुळे आमच्या बायका घर सोडून निघून गेल्या असे म्हणत भांडण करीत त्यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. चाकूने रवीसिंग टाक याच्या अंगावर चाकूने सपासप वार केले केल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला बलवानसिंग (काका) यांनी त्वरित शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तो वाटेतच मरण पावला.
घटनेच्या वेळी भांडण सोडविताना मयताची पत्नी सिमरन कौर टाक ही देखील जखमी झाली. तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर रवीसिंग टाक याचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.
दरम्यान या घटनेची फिर्याद मयताची आई बुंजाकौर टाक यांनी जोडभावी पेठ पोलिसात दाखल केली. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक विजय जाधव हे करीत आहेत.
■ सर्व आरोपी घराला कुलूप लावून पसार
हा प्रकार कळल्यानंतर शासकीय रुग्णालयात मयताच्या नातेवाईकांनी गर्दी करून आरोपीला अटक करण्याची मागणी केली. फरार झालेले आरोपी हे चाकू, विळी, आणि लोखंडाचे वस्तू तयार करतात. खून केल्यानंतर सर्व आरोपी घराला कुलूप लावून पसार झाले असे यावेळी सांगण्यात आले.
■ रांगोळी तयार करणाऱ्या कुटुंबाची राखरांगोळी
मयत रवीसिंग टाक याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई वडील आणि तीन भाऊ असा परिवार आहे. त्यापैकी दोघे भाऊ परगावी राहतात. या ठिकाणी त्यांचे कुंटूंबिय विविध रंगाची रांगोळी तयार करून त्याची विक्री करतात. पण या हत्येने रांगोळी करणाऱ्या कुटुंबाचीच राखरांगोळी झाल्याचे बोलले जात आहे.