सोलापूर – पुणे महामार्गावर टेंभुर्णी नजीक काल रात्री शिराळपाटी जवळ सोलापूर शहर पोलीसांच्या बॉम्बशोधक पथकाच्या वाहनाला अपघात झालायं. आयशर टेम्पोनं पोलीस गाडीला पाठीमागून धडक दिली आणि त्यानंतर पोलीस गाडी पालथी होवून सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना कमी-अधिक प्रमाणात मुकामार लागला आहे. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. Solapur. Police van accident near Tembhurni, six policemen injured
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीत शुक्रवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास शिराळा पाटीजवळ पोलिसांची व्हॅन व टेम्पोचा अपघात झाला. यात सहा पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती टेंभुर्णी पोलिसांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज शुक्रवार पहाटे एकच्या सुमारास सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णीजवळील शिराळा पाटीजवळ सोलापूर शहर पोलिसांची बीडीडीएस गाडी नंबर एमएच १३ सीयू ०७३३ ही पुण्याहून सोलापूरकडे येत असताना पाठीमागून सोलापूरकडे येत असलेला टेम्पो एमएच ४३ बीपी ९५५१ या गाडीने पोलिसांच्या व्हॅनला जोराची धडक दिली.
या धडकेत सहा पोलिस कर्मचारी व एक श्वान जखमी झाला आहे. या अपघातात जखमी झालेल्या पेालिसांवर टेंभुर्णी येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस नाईक चुंगे, पोलीस कॉन्स्टेबल रोकडे, शिंदे, सावंत, पोलीस नाईक गवळी, बंडदाळ असे जखमी झालेल्या पोलिसांची नावे आहेत.
पोलीस नाईक प्रविण चंद्रकांत घुगे, मंगेश राघोबा रोकडे, रोहित प्रकाश शिंदे, अंकुश विनायक सावंत, सुदर्शन सुभाष गवळी, अमोल महादेव बांदल असे जखमी झालेल्या पोलिसांची नावे आहेत.
या अपघातानंतर टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या अधिकारी, अंमलदार यांनी तात्काळ अपघातस्थळावर पोहोचून जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 सोलापूर जिल्ह्यात महिलांना लुटल्याच्या दोन घटना
सोलापूर – जिल्ह्यात काल गुरूवारी दोन ठिकाणी महिलांना लुटल्याची घटना घडली आहे. पहिल्या घटनेत करमाळा तालुक्यातील अंजनडोह गावात महिलेच्या घरात घुसून चोरट्यांनी कोयता व चाकूचा धाक दाखवून तिच्या अंगावरील ५२ हजाराचे सोन्याचे दागिने काढून घेतलेत तर दुसऱ्या घटनेत मोहोळ तालुक्यातील वाळूज येथे चौघा चोरट्यांनी महिलेस मारहाण करुन तोंडावर पावडर टाकून बेशुद्ध करीत तिच्या अंगावरील 68 हजाराचे दागिने घेतलेत.
या दोन्ही प्रकारामुळे ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे. काल पहाटेच्या वेळी करमाळा तालुक्यातील अंजनडोह गावात दोन चोरटे महिलेच्या घरात घुसले. यावेळी महिला स्वयंपाकगृहात काम करत होती. चोरट्यांनी तिला कोयता व चाकूचा धाक दाखवून तिच्या अंगावरील सोन्याचे ५२ हजाराचे दागिने काढून घेतले. पार्वती महादेव मेढे असं लुटण्यात आलेल्या महिलेचं नांव असून या घटनेची नोंद करमाळा पोलीस ठाण्यात झाली आहे.
दुसरी घटना मोहोळ तालुक्यातील वाळूज गावात सकाळी १० वाजता घडली आहे. संजना बाबासाहेब खरात (वय ३६) हि महिला शेताकडे निघाली असता वाळूज- वैराग रस्त्यावर तोंडाला कापड बांधून आलेले चौघेजण आले व त्यांनी त्यांच्या डोक्यावरील टोपली खाली पाडून हाताने मारहाण केली व कसली तरी पावडर टाकून महिलेस बेशुद्ध केले. महिला बेशुद्ध होवून खाली पडल्यावर तिच्या अंगावरील ६८ हजाराचे सोन्याचे दागिने काढून घेवून पोबारा केला. या घटनेची नोंद वैराग पोलीस ठाण्यात झाली आहे.