□ मुख्य आरोपीसह तिघे सोलापूरचे, इतर कर्नाटकातील
■ सायबर गुन्हेगारांवर मोकानुसार पहिल्यांदाच कारवाई
पुणे / सोलापूर : लोन ॲपच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना कर्ज घेण्यास भाग पाडून नागरिकांचे जगणे मुश्कील करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोका) कारवाई केली आहे. सायबर गुन्हेगारांवर ‘मोका नुसार. झालेली ही पहिली कारवाई असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. In the name of loan app, the Pune police have targeted the Ganda Solapuri Punekar gang.
लोन ॲपच्या माध्यमातून इन्स्टंट लोन देण्याचे आमिष दाखवून देशभरातील हजारो लोकांना धोका देणाऱ्या सोलापुरातील धीरज पुणेकरच्या टोळीला पुणे शहर पोलिसांनी मोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा) लावला आहे. सायबर अॅक्टखाली दाखल झालेल्या गुन्ह्यात मोका अंतर्गत कारवाई महाराष्ट्रातील पहिलीच कारवाई करून पुणे पोलिसांनी सायबर गुन्हेगारांना धक्का दिला आहे. या कारवाईत अन्य तीन सोलापुरी तरुणांचाही समावेश असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले.
या टोळीतील मुख्य आरोपीचे आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध असल्याची माहिती पुढे आली असून, पोलीस त्याचा शोध घेत आहे. मुख्य आरोपी व टोळी प्रमुख धीरज भारत पुणेकर (वय ३६, रा. सोलापूर), स्वप्नील हनुमत नागटिळक (वय २९, रा. विजापुर रोड, सोलापूर), श्रीकृष्ण भिमण्णा गायकवाड (वय २६, रा त्रिवेणीनगर भेकराईनगर फुरसुंगी, हडपसर), प्रमोद जेम्स रणसिंग (वय ४३, रा. मुमताजनगर कुमठेनाका, सोलापूर), सॅम्युअल संपत कुमार (वय ४० डिकोजा रोड बेलातुर बेंगळूर, कर्नाटक), सय्यद अकिब पाशा (वय २३, वर्षे रा. बेंगळूर, कर्नाटक ), मुबारक अफरोज बेंग (वय २२, रा. बेंगळूर, कर्नाटक), मुजीब बरांद कंदियल पिता इब्राहिम (वय ४२, रा. कोझीकोड, अरुर केरळ), मोहम्मद मनियत पिता मोहिदु (वय ३२, रा. पडघरा, केरळ) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत.
संबंधित आरोपींनी संघटित गुन्हेगारी करून आर्थिक फायदा देण्याचे आमिष दाखवित हजारो नागरिकांची फसवणूक केली. टोळीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर येत आहे. ‘लोन अॅप द्वारे फसवणूक झाल्याने राज्यात दोघांनी आत्महत्या केली, तर एक खुनाची घटना देखील घडली आहे. धीरज पुणेकरच्या टोळीने लोन ॲपच्या माध्यमातून उकळलेला पैसा दुबईमार्गे चीनला कसा पोहचवला जात असल्याचे वृत्त आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ टोळी प्रमुख धीरज पुणेकरवर बलात्कारासह अनेक गुन्हे
धीरज भारत पुणेकर याच्यावर शासकीय कंत्राटांमध्ये अपहार करत शासनाची फसवणूक करणे, परताव्याच्या किंवा जमा केलेल्या रकमेची मागणी केल्यास कुटुंबास जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार करणे, अवैध कर्जाच्या वसुलीसाठी खंडणी मागणे, बेकायदेशीर कृत्ये करणे असे गुन्हे त्याच्यावर पुणे आणि सोलापूरमध्ये प्रत्येकी एक बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. तो सध्या हैद्राबाद येथे एका गुन्ह्यात अटक आहे.
□ टोळीच्या त्रासाला कंटाळून दोघांची आत्महत्या
लोन अॅपद्वारे इन्स्टंट लोन घेतल्यानंतर अव्वाच्या सव्वा व्याज आकारणी करून ते भरण्यासाठी ही टोळी कर्जदारांना विविध प्रकारे त्रास देत होती. कर्जदाराच्या मोबाईलमधील डाटा वापरून अश्लील मेसेज तयार करून ते मोबाईल कॉन्टॅक्टमधील नंबरवर व्हायरल करण्यापर्यंत या टोळीची मजल जात होती. अशा प्रकारच्या त्रासाला कंटाळून पुण्यात दोघांनी आत्महत्या केली आहे. शिवाय याच त्रासाला वैतागून नातीने आजीचा खून केल्याचा प्रकारही घडला आहे. या प्रकरणांची दखल घेऊन पुण्याच्या सायबर पोलिसांनी या टोळीला बेड्या ठोकल्या.
□ सायबर गुन्हेगारांना चाप बसेल
लोन ॲपव्दारे लोकांना त्रास देण्याचे प्रकार काही वर्षापासून सुरू होते. यामुळे दोन आत्महत्या व एक खून झाला होता. या पार्श्वभूमीवर सायबर पोलिसांनी कारवाई करून हे प्रकरण उघडकीस आणले. हे आरोपी महाराष्ट्रासह देशभरात अनेकांना फसवत असल्याचे लक्षात आले. त्यांचे धागेदोरे अन्य देशातही असल्याचे उघड झाले. या टोळीवर मोकाची कारवाई केल्याने सायबर गुन्हेगारांना चाप बसेल, असे अमिताभ गुप्ता (पोलीस आयुक्त) यांनी सांगितले.
□ आ. विजय देशमुखांना जीवे मारण्याची धमकी; पोलीस आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश
सोलापूर : सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाचे भाजप आमदार विजय देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी पत्राद्वारे दिल्याचे समोर आले आहे. यामुळे शहरात खळबळ माजली आहे. याबाबत पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
गेल्याच महिन्यात राज्यभर तसेच देशभरात पीएफआय या देशविघातक संघटनेच्या ठिकठिकाणीच्या कार्यालयावर तसेच कार्यकर्ते राहत असलेल्या घरावर छापे मारून अनेकांची धरपकड केली. सोलापुरात सुद्धा पीएफआयच्या संघटनेच्या एका कार्यकर्त्यांची धरपकड करून त्याला अटक केली. हे प्रकरण ताजे असतानाच सोलापुरातील भाजपचे आमदार विजय देशमुख यांना पीएफआयच्या कार्यकर्त्याकडून जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले असल्याची माहिती आमदार विजय देशमुख यांनी दिली.
तसेच त्यांनी ५ ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांची भेट घेऊन आपल्या स्तरावरून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात मोहम्मद शफी बिराजदार (रा.सहारा नगर, नई जिंदगी, मजरेवाडी सोलापूर) या इसमाने स्वतःच्या हस्तलिखिता मध्ये १ आक्टोंबर रोजी पोस्टाने हे पत्र आ.विजय देशमुख यांना पाठवलेले आहे.
या पत्रामध्ये पीएफआयच्या पीएफआय या संघटनेच्या कार्यकर्त्याकडून गलिच्छ भाषा वापरून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचे म्हटले आहे. या पत्राची पोलीस आयुक्त यांनी गांभीर्याने दखल घेऊन या संदर्भात अधिक चौकशीचे आदेश दिले आहेत.
“काल गुरुवारी हे पत्र प्राप्त झाले आहे. त्या अनुषंगाने पत्रात दिलेल्या नावाची शहनिशा करण्याकरिता चौकशी सुरू आहे. पूर्ण चौकशी झाल्याशिवाय निश्चित अनुमान काढता येणार नाही”
सुनील दोरगे – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा