• सोलापूर / ॲड. राजकुमार नरुटे
लोन ॲपच्या माध्यमातून देशभरातील अनेकांना लुबाडणाऱ्या सोलापुरातील धीरज पुणेकर टोळीला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकताच या टोळीचे कनेक्शन चीनपर्यंत पोहचल्याचे उघडकीस आले आहे. लोनॲपच्या माध्यमातून भारतातून गोळा झालेला पैसा दुबईमार्गे चीनला पोहचवणारी इंटरनॅशनल मनी ट्रॅफिकिंगची भली मोठी साखळी पुणे पोलिसांच्या हाती लागली आहे. मात्र दुबईमध्ये तळ ठोकलेल्या किंग आणि लेमन या चीनच्या इंटरनॅशनल चिटर्सना पकडण्याचे भलेमोठे आव्हान आता पुणे पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. International Money Trafficking Revealed, Loan App Diverts India’s Money to Criminals in China via Dubai
दुबईस्थित किंग आणि लेमन या चिनी चिटर्सच्या जोडगोळीने दुबईत बसून धीरज पुणेकर याच्या टोळीसारख्या आणखी काही टोळ्या ऑपरेट करण्याचा उद्योग सुरू केला आहे. या उद्योगातून गोळा झालेली कोट्यवधींची रक्कम दुबईमार्गे चीनला पळवण्याचे काम या जोडगोळीने आत्तापर्यंत केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, सोलापुरातील धीरज भारत पुणेकर (वय ३६, रा. संजयनगर, कुमठानाका, घर नं. ७५, सोलापूर) आणि स्वप्निल हनुमंत नागटिळक (वय २९, सध्या रा. पापारामनगर, विजापूर रोड, सोलापूर, मूळ रा. विजापूर नाका झोपडपट्टी नं. २, चाँदतारा मशिदसमोर, सोलापूर) यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्यावतीने ॲड. मृणाल कांबळे यांनी काम पाहिले.
● पुणेकर टोळीचे काम
सोलापुरातील धीरज पुणेकर याने तयार केलेली टोळी सामान्य मजूर, कामगार यांना कामाचे आणि पैशाचे आमिष दाखवून त्यांच्या नावाने विविध बँकांमध्ये चालू व बचत खाते उघडण्याचे काम करत होती. या बँक खात्यांना मात्र या टोळीतील सदस्यांचे मोबाईल नंबर लिंक केले जायचे. खाती काढल्यानंतर संबंधित खात्याचे पासबुक, चेकबुक, एटीएम कार्ड, इंटरनेट बँकिंग आयडी, पासवर्ड ताब्यात घेणे संबंधित खातेदारांच्या नावे मोबाईल सीम कार्ड खरेदी करून ते इंटरनॅशनल टोळीला पुरवण्याचे काम पुणेकर टोळीकडे देण्यात आले होते.
● बेंगलोरच्या टोळीचे काम
बेंगलोरच्या टोळीकडे कॉलसेंटर चालवण्याचे काम देण्यात आले होते. या टोळीतील सदस्य बेंगलोरच्या कॉलसेंटरमध्ये बसून व्हॉटस्अॅप कॉल व मेसेज करून कर्जदारांना धमकावत होते. विशेषत: कर्जदारांच्या घरातील महिलांना धमकावून त्यांच्याकडून विविध बँक खात्यांमध्ये पैसे भरून घेतले जात होते. जर कर्जदारांनी पैसे नाही भरले तर त्यांच्या फोटोंचे मॉर्फिंग करून अश्लील चित्रफीत आणि मजकूर बनवून तो कर्जदाराच्या मोबाईलमधील काँटॅक्टलिस्टमधील नंबरवर व्हायरल करण्याचे काम या टोळीकडे सोपवण्यात आले होते.
● यूपीमधील टोळीचे काम
या संपूर्ण गुन्ह्यात आणखी एक टोळी सक्रिय असून ती उत्तर प्रदेशातील आहे. कर्जदारांनी कर्ज घेतल्यानंतर बेंगलोरच्या कॉलसेंटरमधून त्यांना सोलापूरच्या टोळीने दिलेल्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास धमकावले जायचे. कर्जदारांनी भरलेले पैसे काढून ते दुबईला पोहचवण्याचे काम उत्तर प्रदेशमधील या टोळीकडे सोपवण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. मात्र ही टोळी अद्याप पोलिसांच्या हाती लागली नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 लोन ॲपच्या नावाने घातला अनेकांना गंडा; सोलापुरी ‘पुणेकर’ टोळीला पुणे पोलिसानी लावला ‘मोका’
पुणे / सोलापूर : लोन ॲपच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना कर्ज घेण्यास भाग पाडून नागरिकांचे जगणे मुश्कील करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोका) कारवाई केली आहे. सायबर गुन्हेगारांवर ‘मोका नुसार. झालेली ही पहिली कारवाई असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
लोन ॲपच्या माध्यमातून इन्स्टंट लोन देण्याचे आमिष दाखवून देशभरातील हजारो लोकांना धोका देणाऱ्या सोलापुरातील धीरज पुणेकरच्या टोळीला पुणे शहर पोलिसांनी मोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा) लावला आहे. सायबर अॅक्टखाली दाखल झालेल्या गुन्ह्यात मोका अंतर्गत कारवाई महाराष्ट्रातील पहिलीच कारवाई करून पुणे पोलिसांनी सायबर गुन्हेगारांना धक्का दिला आहे. या कारवाईत अन्य तीन सोलापुरी तरुणांचाही समावेश असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले.
या टोळीतील मुख्य आरोपीचे आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध असल्याची माहिती पुढे आली असून, पोलीस त्याचा शोध घेत आहे. मुख्य आरोपी व टोळी प्रमुख धीरज भारत पुणेकर (वय ३६, रा. सोलापूर), स्वप्नील हनुमत नागटिळक (वय २९, रा. विजापुर रोड, सोलापूर), श्रीकृष्ण भिमण्णा गायकवाड (वय २६, रा त्रिवेणीनगर भेकराईनगर फुरसुंगी, हडपसर), प्रमोद जेम्स रणसिंग (वय ४३, रा. मुमताजनगर कुमठेनाका, सोलापूर), सॅम्युअल संपत कुमार (वय ४० डिकोजा रोड बेलातुर बेंगळूर, कर्नाटक), सय्यद अकिब पाशा (वय २३, वर्षे रा. बेंगळूर, कर्नाटक ), मुबारक अफरोज बेंग (वय २२, रा. बेंगळूर, कर्नाटक), मुजीब बरांद कंदियल पिता इब्राहिम (वय ४२, रा. कोझीकोड, अरुर केरळ), मोहम्मद मनियत पिता मोहिदु (वय ३२, रा. पडघरा, केरळ) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत.
संबंधित आरोपींनी संघटित गुन्हेगारी करून आर्थिक फायदा देण्याचे आमिष दाखवित हजारो नागरिकांची फसवणूक केली. टोळीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर येत आहे. ‘लोन अॅप द्वारे फसवणूक झाल्याने राज्यात दोघांनी आत्महत्या केली, तर एक खुनाची घटना देखील घडली आहे. धीरज पुणेकरच्या टोळीने लोन ॲपच्या माध्यमातून उकळलेला पैसा दुबईमार्गे चीनला कसा पोहचवला जात असल्याचे वृत्त आहे.
□ टोळी प्रमुख धीरज पुणेकरवर
बलात्कारासह अनेक गुन्हे
धीरज भारत पुणेकर याच्यावर शासकीय कंत्राटांमध्ये अपहार करत शासनाची फसवणूक करणे, परताव्याच्या किंवा जमा केलेल्या रकमेची मागणी केल्यास कुटुंबास जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार करणे, अवैध कर्जाच्या वसुलीसाठी खंडणी मागणे, बेकायदेशीर कृत्ये करणे असे गुन्हे त्याच्यावर पुणे आणि सोलापूरमध्ये प्रत्येकी एक बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. तो सध्या हैद्राबाद येथे एका गुन्ह्यात अटक आहे.
□ टोळीच्या त्रासाला कंटाळून दोघांची आत्महत्या
लोन अॅपद्वारे इन्स्टंट लोन घेतल्यानंतर अव्वाच्या सव्वा व्याज आकारणी करून ते भरण्यासाठी ही टोळी कर्जदारांना विविध प्रकारे त्रास देत होती. कर्जदाराच्या मोबाईलमधील डाटा वापरून अश्लील मेसेज तयार करून ते मोबाईल कॉन्टॅक्टमधील नंबरवर व्हायरल करण्यापर्यंत या टोळीची मजल जात होती. अशा प्रकारच्या त्रासाला कंटाळून पुण्यात दोघांनी आत्महत्या केली आहे. शिवाय याच त्रासाला वैतागून नातीने आजीचा खून केल्याचा प्रकारही घडला आहे. या प्रकरणांची दखल घेऊन पुण्याच्या सायबर पोलिसांनी या टोळीला बेड्या ठोकल्या.
□ सायबर गुन्हेगारांना चाप बसेल
लोन अॅपव्दारे लोकांना त्रास देण्याचे प्रकार काही वर्षापासून सुरू होते. यामुळे दोन आत्महत्या व एक खून झाला होता. या पार्श्वभूमीवर सायबर पोलिसांनी कारवाई करून हे प्रकरण उघडकीस आणले. हे आरोपी महाराष्ट्रासह देशभरात अनेकांना फसवत असल्याचे लक्षात आले. त्यांचे धागेदोरे अन्य देशातही असल्याचे उघड झाले. या टोळीवर मोकाची कारवाई केल्याने सायबर गुन्हेगारांना चाप बसेल.
– अमिताभ गुप्ता (पोलीस आयुक्त)