अखिल भारतीय काँग्रेस महासमितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांची निवड झाल्यानंतर काँग्रेस पक्षाचा इतिहास उजळून निघाला आहे. 24 वर्षांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली आणि गांधी घराण्याखेरीज खरगेंच्या रूपाने पहिल्यांदाच या नेत्याला हा बहुमान मिळाला. अशा प्रकारची स्तुतिसुमने उधळली गेली. New Congress president Mallikarjun Kharge’s challenges Politics Gandhi family
आता खरगे मनाप्रमाणे पक्ष चालवणार की गांधी घराण्याकडे सतत हेलपाटे मारून निर्णय घेणार हा खरा प्रश्न असून त्याचे उत्तर येणाऱ्या काळात मिळेल, यात शंकाच नाही. खरगेंना गांधी घराण्याचे ऐकावेच लागेल, असे ज्येष्ठ नेते पी. चिरंबरम् यांनी म्हटले आहे. मात्र, एक गोष्ट प्रकर्षाने समोर येतेय ती म्हणजे खरगेंची कारकीर्द पक्षाला उभारी देणार काय?
८० वर्षीय मल्लिकार्जुन खरगे यांच्या खांद्यावर पक्षाची पुनर्बांधणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी असेल. मागील काही वर्षांत काँग्रेसला सतत पराभवाचा सामना करावा लागला. केंद्रीय सत्तेतून हा पक्ष हद्दपार झाला. पुन्हा तिथे सत्ता येण्याची शक्यता कमी दिसते. कारण प्रादेशिक पक्षांचा पुन्हा धुमाकूळ सुरू झाला आहे. पूर्वीप्रमाणे काँग्रेस पक्षाला ते नाचवत राहतील, असे दिसते. त्यामुळे खरगे यांच्यासमोर एक दोन नाही तर अनेक आव्हान आहेत.
काँग्रेस हा देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष आहे. या पक्षाला मोठा वैभवशाली राजकीय इतिहास आहे. पण मागच्या काही वर्षांत काँग्रेसची झालेली अवस्था अस्वस्थ करणारी आहे. त्यामुळे नवीन अध्यक्षाला आता काँग्रेसच्या जुन्या इतिहासात रमून चालणार नाही, त्यांना वस्तुस्थिती लक्षात घेऊन मतदारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी नावीन्यपूर्ण काम करावे लागेल. लोकांच्या मनात काँग्रेस पुन्हा रुजवण्यासाठी नेहमीपेक्षा वेगळे प्रयत्न करावे लागतील.
सध्याच्या राजकीय स्थितीत आपण नेहरू किंवा गांधी कुटुंबाकडून नियंत्रित केले जात नाहीत, असा स्पष्ट संदेश खरगे यांना लोकांमध्ये द्यावा लागेल. अन्यथा ते केवळ नावाला अध्यक्ष झाले आहेत आणि सत्ता दुस-या कुणाच्या तरी हातात आहे, असा संदेश लोकांमध्ये जाऊ शकतो. अशी प्रतिमा बनू न देण्यासाठी खरगे यांना विशेष प्रयत्न करावे लागतील. हे करत असताना गांधी कुटुंबासोबत संघर्ष उद्भवणे काँग्रेसला परवडणारे नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
काँग्रेसच्या नेतृत्वाशिवाय देशात विरोधी गट तयार होऊ शकत नाही, असा विश्वास काँग्रेसच्या अन्य नेत्यांप्रमाणे खरगे यांचाही आहे. अध्यक्ष बदलल्याने आता पक्षाची गतिशीलताही बदलली आहे. काँग्रेस पक्ष एकीकडे अस्तित्वाची लढाई लढत असताना, अनेक प्रादेशिक पक्ष आशेचा किरण ठरत आहेत. त्यामुळे संबंधित पक्षातील मतभेद मिटवून विरोधकांमध्ये एकजूट निर्माण करण्याचे आव्हान खरगे यांच्यासमोर असेल.
दरम्यान, मल्लिकार्जुन खरगे यांना अनेक कळीच्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल. ममता बॅनर्जी, नितीश कुमार आणि उध्दव ठाकरे यांसारख्या प्रादेशिक नेत्यांना निमंत्रित करून त्यांना नेतृत्वाची भूमिका द्यावी लागेल. संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा लागेल. पक्षाअंतर्गत संघटनात्मक सुधारणा करणे, हे खरगे यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान असेल.
कॉंग्रेस वर्किंग कमिटीच्या निवडणुकीसाठी ते पुढे सरसावतील का? हा पहिला प्रश्न आहे. काँग्रेसच्या घटनेनुसार वर्कींग कमिटीत पक्षाध्यक्ष, संसदेतील काँग्रेस पक्षाचा नेता आणि इतर २३ सदस्य असणे गरजेचे आहे. यातील १२ सदस्य हे कमिटीकडून निवडून द्यावे लागतात. त्यामुळे काँग्रेस वर्किंग कमिटीसाठी निवडणूक, संसदीय मंडळाच्या यंत्रणेचे पुनरुज्जीवन आणि लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी तिकिटांचा निर्णय घेणारी वास्तविक केंद्रीय निवडणूक समितीची स्थापना करावी लागेल.
या जी २३ गटातील नेत्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. या गटातील नेत्यांनी आधीच खरगे यांना पाठिंबा दिला आहे. पक्षातील तरुण आणि दिग्गज नेत्यांमधील दरी कमी करणे, हे खरगे यांच्यासमोरील मोठे आव्हान आहे. एआयसीसीचे उमेदवार म्हणून खरगे यांच्याकडे पाहिले जात होते. यामुळे ICC मधील सर्व वयोगटातील नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला. पण तरुण आणि दिग्गज नेत्यांमधील दरी अनेक राज्यांमध्ये दिसून येते.
विशेषत: राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात मागील काही वर्षांपासून वाद धुमसत आहे. केवळ राजस्थानच नव्हे तर केरळ, तेलंगणा, गोवा, दिल्ली आणि पंजाब यासारख्या राज्यांमध्येही असा वाद सुरू आहे. त्यातल्या त्या खडतर प्रवास म्हणजे मोदी लाट कशी संपवणार? देशाची मानसिकता कशी बदलणार? पक्षापुढे कार्यक्रम काय आहे? असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्यापुढे असतील.
📝 📝 📝
दैनिक सुराज्य संपादकीय