सोलापूर : सोलापुरात राष्ट्रवादीचे काटे उलटे फिरण्याची शक्यता आहे. पक्षातील जुन्या नव्या पदाधिकाऱ्यांचा वाद विकोपला गेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील एक गट बंडाळीच्या तयारीत आहे. हे बंडोबा आता मनगटातील घड्याळ टाकून हाती शिंदे गटाची ढाल-तलवार घेण्याची तयारी करत असल्याचे सांगण्यात येते. Solapur. Bandoba in NCP preparing to shake Shaddu; Drop the watch and take the shield and sword? Dilip Kolhe
राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतल्याने या चर्चेला उधाण आले आहे. सोलापूर शहरात आता पर्यंत काँग्रेस समवेत आघाडी करून राष्ट्रवादीने पालिकेत तब्बल तीन टर्म सत्ता भोगली. मात्र गत पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीचे पानिपत झाले. १४ नगरसेवक असताना फक्त चार नगरसेवक विजयी झाले. त्यामुळे पक्षश्रेष्ठी सोलापुरातील पदाधिकाऱ्यांवर नाराज होते.
इन मीन चार सदस्य असलेल्या सोलापुरातील राष्ट्रवादीच्या पक्षाच्या ढीगभर तक्रारी पक्षश्रेष्ठीकडे गेल्या होत्या. त्यामध्ये सोलापूरची राष्ट्रवादी गटा तटाच्या राजकारणात विभागली गेली होती. मात्र, साधारण तीन वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे महाआघाडीचे सरकार आले. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. परिणामी राष्ट्रवादीच्या बालेकिल्याकडे राष्ट्रवादीचे दस्तूरखुद राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी विशेष लक्ष घातले.
राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची संख्या वाढली. माजी महापौर महेश कोठे, तौफिक शेख, आनंद चंदनशिवे, सुधीर खरटमटल, प्रमोद गायकवाड राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसू लागले. महेश कोठे यांनी तर खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत हुतात्मा स्मृती मंदिरात भव्य मेळावा घेतला. यावेळी खा. पवार यांनी पालिकेत राष्ट्रवादीचा महापौर करण्यासाठी कामाला लागण्याचा कानमंत्र दिला. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये पुन्हा नवचैतन्य आले कोमात गेलेली राष्ट्रवादी पुन्हा जोमात आली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
पालिकेच्या निवडणुकीसाठी समिती गठित करण्यात आली. महेश कोठे यांच्या खांद्यावर शहराची औपचारिक जबाबदारी दिली तर काही इतर पक्षातील आलेल्या नव्या नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांची कार्यकारणीमध्ये वर्णी लागली. येथून राष्ट्रवादी पक्षातील जुन्या आणि नव्या नेत्यांचा वाद पेटला. राज्यातील महाआघाडी सरकार गडगडल्यानंतर हा वाद शिगेला गेला, पक्षामध्ये जुन्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना मानाचे स्थान दिले जात नाही.
शहराध्यक्ष आणि कार्यध्यक्षांच्या कार्यप्रणालीवर टीका करत पक्षाला काही जणांनी सोडचिठ्ठी दिली. तेव्हापासून राष्ट्रवादीमध्ये पेटलेला वणवा कोल्हे यांच्या रूपाने पुन्हा उफाळून आला आहे. राष्ट्रवादीतील अनेक जण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल होण्याची तयारी करत आहे. शरद पवार यांचे समर्थक माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या रूपाने पहिली
ठिणगी पडली आहे. कोल्हे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांची भेट घेऊन मनगटातील घड्याळ काढून हाती मशाल घेण्याचे संकेत दिल्याने सोलापुरातील राष्ट्रवादीमध्ये मोठे बंड होण्याची शक्यता असल्याचे सध्याचे चित्र आहे.
नवीन पदाधिकाऱ्यांनी पदभार घेताच पक्षवाढीसाठी काही केले नाही. पदे घेऊन हार तुरे घेण्यात ही पदाधिकारी मश्गूल झाल्याचा आरोप जुन्या पदाधिकाऱ्यांनी केला. कोणत्याही नियुक्ती करताना बैठकीसाठी जुन्या पदाधिकाऱ्यांना डावले जात असल्याने पक्षात मोठी नाराजी पसरली होती. बोलले जात आहे. दिलीप कोल्हे यांच्यासमवेत अनेक जुने नवे राष्ट्रवादीतील नेते पदाधिकारी, कार्यकर्ते बंड करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश करत हातात मशाल घेणार असल्याने शहरातील निम्मी राष्ट्रवादी फुटणार असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत पक्षाचे निरीक्षक शेखर माने यांना विचारणा केली असता राष्ट्रवादीमध्ये बंडाळीचा प्रकार होणार नाही. कोल्हे यांना सावंत यांच्या भेटीबाबत विचारणा केली आहे. कोल्हे हे शरद पवार यांचे विश्वासू आहेत. पवार साहेबांची ते साथ सोडणार नाहीत, असा खुलासा त्यांनी केला. या बाबत कोल्हे यांना विचारणा केली असता कोल्हे यांचा मोबाईल वर प्रतिसाद दिला नाही त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही.
□ पहिली ठिणगी
सोलापूरचे निरीक्षक म्हणून शेखर माने यांची नियुक्ती झाली. त्यांच्या उपस्थितीत पहिली बैठक सुभद्राबाई मंगल कार्यालयात झाली या बैठकीत प्रभाग रचनेवरून पक्षामध्ये पहिल्या वादाची ठिणगी पडली. शेखर माने यांच्यासमोर माजी नगरसेवकांनी प्रभाग रचनेवरून वाद घालत पदाधिकाऱ्यांवर आरोप केले येथून वादावादीला सुरुवात झाली.
माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत खुर्चीवर बसण्यावरून वाद रंगला. जुन्या पदाधिकाऱ्यांना या बैठकीत अपमान करत खुर्चीवर उठवत नव्याने आलेल्या नेत्यांना बसवल्याने राष्ट्रवादीतील जुने नेते मंडळी नाराज झाली.